राज्यसभेत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता. परंतु, तरीही भाजपाच्या उमेदवाराल सर्वाधिक मते मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. परिणामी हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झालं आहे. तर, मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी काँग्रेसवर आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर, दुसरीकडे भाजपाने राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली आहे. तसंच, भाजपा आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने १५ भाजपा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत या तीन घडामोडी घडल्या आहेत.

राज्यसभेत क्रॉस वोटिंग

मंगळावीर देशात ४१ जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये एका जागेसाठी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. काँग्रेस सत्ताधारी असल्याने त्यांच्याकडे बहुमत होते. तसंच अपक्षांचाही पाठिंबा होता. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल अशी चिन्हे होती. परंतु, याठिकाणी भाजपाचा उमेदवार जिंकून आला. त्यामुळे येथे क्रॉस वोटिंग झाल्याचं उघड झालं. भाजपामधून हर्ष महानज आणि काँग्रेसमधून अभिषेक मनु सिंघवी असे उमेदवार उभे होते. परंतु, येथे भाजपाने बाजी मारल्याने आता भाजपाने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने आता बहुमत गमावले असून त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आली. तसंच, राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेस सरकारची बहुमत चाचणी घेण्याची विनंती करण्यात आली.

राजिंदर राणा, सुधीर शर्मा, चैतन्य शर्मा, इंदर दत्त लखनपाल, दविंदर कुमार भुट्टो आणि रवी ठाकूर या सहा काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा >> युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसच्या मंत्र्याचा राजीनामा

सुखविंदर सिंग सुखू सरकारने आपल्याच आमदारांचा अनेक वेळा अपमान केला, असा आरोप करत काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंग यांनी बुधवारी सकाळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते पुढे म्हणाले, “आता हिमाचलमध्ये काँग्रेस पुढे कोठे आहे हे पक्षाच्या हायकमांडला ठरवायचे आहे. लोकांनी मतदान केले म्हणून ते सरकार वाचले पाहिजे अशी आमची इच्छा आहे.”

विधानसभेत भाजपा आमदारांचं निलंबन

विधानसभेत भाजपा आमदारांनी गोंधळ घातल्याने १५ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. जय राम ठाकूर, विपिनसिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण चंद, इंद्रसिंह गांधी, दिलीप ठाकूर, रणवीर सिंग या १५ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.