पीटीआय, लखनऊ
रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे मुस्लिमांना अयोध्येतील धन्नीपूरमध्ये देण्यात आलेल्या जागेत मशिदीचे बांधकाम पुढील वर्षी मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
धन्नीपूरमध्ये मशिदीचे बांधकाम करत असलेल्या ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’ने निधी संकलनासाठी पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपासून वेगवेगळय़ा राज्यांमध्ये प्रभारी नियुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे.मुख्य विश्वस्त आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारूकी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, आतापर्यंतच्या योजनेनुसार धन्नीपूरमधील पाच एकर जागेवर मशिदीचे बांधकाम पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. मशिदीचा अंतिम आराखडा फेब्रुवारीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये राम जन्मभूमी – बाबरी मशीदप्रकरणी निकाल देताना वादग्रस्त जागेवर राम मंदिराचे बांधकाम करण्याचे आणि मुस्लिमांना आध्योध्येतील प्रमुख ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे.