पीटीआय, बंगळूरु : कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात यावी, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकातील राज्य सरकार दांभिक असल्याची टीका मुस्लीम समुदायाने केली. मुस्लीम विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयाच्या आवारात हिजाब परिधान करण्यास बंदी घातली जाते, मग गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी का दिली जाते, असा सवाल विचारला जात आहे.

नागेश यांच्या विधानाचे पडसाद राज्यात उमटले. काही विद्यार्थी संघटनांनी आणि मुस्लीम संघटनांनी त्यांच्यावर टीका केली. ‘‘शिक्षणमंत्र्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणेशमूर्ती विराजमान करण्यास परवानगी देणे म्हणजे शिक्षण क्षेत्रात अशांतता निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे. हे निर्षधार्ह आणि लज्जास्पद आहे. गंमत म्हणजे हे तेच मंत्री आहेत, ज्यांनी शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक प्रथांना परवानगी देता येणार नाही, असे वक्तव्य याआधी केले होते,’’ अशी टीका दी कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे गणेशमूर्तीची स्थापना करणे आणि दुसरीकडे इतर समुदायांना त्यांचे धार्मिक विचार व्यक्त करण्यापासून प्रतिबंधित करणे हे अन्यायकारक आहे. शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक प्रथा किंवा हिजाबसह कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अभिव्यक्तीला परवानगी नाही, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. मग सरकारने गणेशमूर्ती बसविण्यास परवानगी का दिली, त्यामुळे इतर धार्मिक समाजातील विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत का, असा सवाल दी कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य सईद मुईन यांनी विचारला.