देशभरातील करोना रुग्णांची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दैनंदिन अवघे ५ हजार रुग्ण सापडत होते, तो आकडा सध्या ३० हजारांच्या पार गेल्याचं दिसतंय. शनिवारी देशात २७ हजार रुग्ण सापडले होते, त्यानंतर रविवारी देशात तब्बल ३३ रुग्ण आढळले आहे. देशात फक्त करोना रुग्णच नाही तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३३ हजार ७५० करोना रुग्ण आढळले असून १२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर देशभरातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या १७०० वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासांत १० हजार ८४६ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात एकूण बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी ४२ लाख ९५ हजार ४०७वर पोहोचली आहे. तर, मृतांच्या संख्येनं ४ लाख ८१ हजार ८९३चा आकडला पार केलाय. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १४५ कोटी ६८ लाख ८९ हजार ३०६ जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात ५१० रुग्ण असून पाठोपाठ दिल्लीमध्ये ३५१ रुग्ण आहेत. केरळमध्ये १५६, गुजरातमध्ये १३६ ओमायक्रॉन बाधित असून एकूण तामिळनाडूमध्ये १२१ तर राजस्थानमध्ये १२० रुग्ण आहेत. 

देशातील २३ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या पॉझिटीव्हीटी रेट ३.८४ टक्के आहे. आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासारख्या मोठ्या दाट लोकवस्तीच्या महानगरांमध्ये करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.