गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात सात हजार ८३० करोनाचे नवे रुग्ण सापडले असून, ही आकडेवारी गेल्या २२३ दिवसांतील सर्वाधिक आकडेवारी आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात आता सक्रिय करोना रुग्णांचा आकडा ४० हजार २१५ झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दोन लाख १४ हजार २४२ करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३.६५ टक्के म्हणजेच ७,८३० जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, गेल्या २४ तासांत १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, मृतांचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये असून तिथे पाच जण दगावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण पाच लाख ३१ हजार १६ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात सध्या मृतांचे प्रमाण १.१९ टक्के आहे.

गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी करोनाचे ७ हजार ९४६ रुग्ण सापडले होते. त्यानंतर तब्बल २२३ दिवसांनी करोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा आकडा जवळपास आठ हजारांच्या घरात पोहोचला आहे. आतापर्यंत २२०.६६ कोटी करोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

महाराष्ट्रात मंगळवारी (११ एप्रिल रोजी) ९१९ करोनाचे नवे रुग्ण सापडले. तर मुंबईत २४२, नागपुरात १०५, पुण्यात ५८ आणि ५७ नवी मुंबईत रुग्ण सापडले आहेत. तर, अकोल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ७१० रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे राज्यात सध्या ४ हजार ८७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात मृतांचे प्रमाण १.८२ टक्के असून करोनातून बरे होण्याचं प्रमाण ९८.१२ टक्के नोंदवण्यात आलं आहे.