देशात करोनाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या देशातील स्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान देशात करोना रुग्णांची २४ तासातील संख्या ३४९७३ झाली असून २६० जणांचा बळी गेला आहे.

देशातील निम्म्या लोकांना पहिली मात्रा दिली असून एकूण १८ टक्के लोकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ७२ कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत.  करोनामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील गणेशोत्सवावर विरजण पडले. मुंबई शहर पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आदेश १० ते१९ सप्टेंबर या काळात लागू केला आहे. लोकांनी गणपतीचे आभासी दर्शन घ्यावे असे सुचवण्यात आले आहे. दरम्यान करोनाबाबत एका पत्रकार परिषदेत निती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही.के.पॉल यांनी सांगितले, की शाळा उघडण्यासाठी मुलांच्या लसीकरणाची पूर्वअट नाही. हा निकष जगात कुठेही लागू करण्यात आलेला नाही. पण शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे आहे. दरम्यान अर्थचक्र रूळावर येत असून सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी कोविन आयटी मंचावर  डिजिटल लस प्रमाणपत्रांची सेवा उपलब्ध केली आहे. दिल्लीत करोनाचे प्रमाण कमी झाले असून संसर्ग दर केवळ ०.०५ टक्के आहे. मृत्यूंची संख्या शून्यावर आली आहे असे सांगण्यात आले. महिनाभरात राज्यात केवळ एक बळी गेला आहे.

अजूनही दुसरी लाट…

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी असे म्हटले आहे,की अजूनही देश दुसऱ्या लाटेतून बाहेर पडलेला नाही. दुसरी लाट अजून चालू आहे. केरळात २४ तासात २६२०० रुग्ण सापडले असून त्याखालोखाल महाराष्ट्रात ४९१२ रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण ३५ जिल्ह्यात संसर्ग दर १० टक्के असून ३० जिल्ह्यात तो ५ ते १० टक्के आहे.

आरोग्य स्वयंसेवक सज्ज

कोविडची तिसरी लाट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी  ६.६६ लाख आरोग्य स्वयंसेवक सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी दिली. जुलैत ४ लाख आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.  एकूण ४३ दिवसात ६.८८ लाख आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले असून लवकरच हा आ़कडा  ८ लाख होईल.

लसीकरणाचे महत्त्व…

कोविड १९ चे लसीकरण पूर्ण झाले तर रुग्णालयात जाण्याची शक्यता टळते असे संशोधनात दिसून आले असून अमेरिकेतील दोनशे रुग्णालयात याबाबत प्रयोग करण्यात आले. हे संशोधन ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींच्या आधारे हे संशोधन करण्यात आले.