नवी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील २०० लोकांमध्ये करोनाची लक्षणं आढळली असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी सर्व परिसर सील केला आहे. इतकंच नाही तर लॉकडाउनच्या नियमांचं पालन केलं जात आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ मार्च रोजी मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घऱी परतले आहेत. ज्या २०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ते सर्वजण मशिदीच्या जवळच वास्तव्याला आहेत. रविवारी ३४ लोकांना तर सोमवारी १५० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

निजामुद्दीन येथील कार्यक्रमामुळे इतर राज्यांमधील लोकांनाही करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या अदंमान निकोबार येथील सहा जणांना लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. हे सर्वजण कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यानंतर कोलकातामार्गेत पोर्ट ब्लेअरला परतले होते.

याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रीनगरमधील ६५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. तर आंध्र प्रदेशातील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

पोलिसांनी मशिदीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसंच गेल्या एक आठवड्यापासून परिसरात मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 175 people tested 2000 quarantined at nizamuddin area of delhi sgy
First published on: 30-03-2020 at 17:33 IST