दिल्लीतील एका कंपनीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनानं त्याच्या संपर्कात आलेल्या दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना क्वारंटाइनमध्ये हलवलं आहे. यात हाऊज खास आणि मालवीय नगरमधील पिझ्झा मागवणाऱ्या नागरिकांचा समावेश असून, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली असल्याचं दक्षिण दिल्लीचे जिल्हान्याय दंडाधिकारी बी. एम. मिश्रा यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील एका पिझ्झा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाचा संसर्ग झाल्याचं मागील आठवड्यात निष्पन्न झालं. हा कर्मचारी मागील आठवड्यात डायलिसीस करण्यासाठी रुग्णालयात गेला होता. त्यावेळी तो करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. हा कर्मचारी मागील आठवड्यापर्यंत पिझ्झा डिलिव्हरीचंही काम करत होता. त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्याचबरोबर या व्यक्तीनं ज्या घरांमध्ये पिझ्झा डिलिव्हरी केली. दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना जिल्हा प्रशासनानं तातडीनं क्वारंटाइन केलं. त्यांची चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे. मात्र, काही कालावधीनंतरही यांची लक्षणं दिसण्याची शक्यता असल्यानं त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ७ दिवसानंतर पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. दरम्यान, सध्या राजधानी दिल्लीतील स्थितीही करोनामुळे चिंता करण्यासारखी आहे. महाराष्ट्र, तामिळनाडूनसह दिल्लीतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून अत्यावश्यक पावलं उचलली जात आहेत.

दिल्लीतील हॉटस्पॉट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशभरातील हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. ज्या ठिकाणी करोनाचे जास्त रुग्ण आढळून आले, अशा भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यात दिल्लीतील दक्षिम दिल्ली, शहदरा, दक्षिण पूर्व, पश्चिच दिल्ली, उत्तर दिल्ली, मध्य दिल्ली, पूर्व दिल्ली, नवी दिल्ली आणि दक्षिण पश्चिम दिल्ली या परिसरांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 72 quarantined after pizza man tests positive bmh
First published on: 16-04-2020 at 11:52 IST