चीननंतर जगभरात पोहोचलेल्या करोना विषाणुनं सगळ्याच्याच नाकीनऊ आणल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरूवातीच्या काही आठवड्यांमध्ये मंदगतीनं पसरलेल्या करोनानं आता वेग पकडला आहे. दिवसेंदिवस जगात करोनाग्रस्तांची संख्या हजार आणि लाखांनी वाढत चालली आहे. ही वाढ बघून जागतिक आरोग्य संघटनेनं मोठी भीती व्यक्त केली आहे. ‘पुढील काही दिवसात करोनामुळे ५० हजार लोक मरण पावतील,’ सघटनेचे महासचिव टेद्रोस अधानोम गेब्रेसुस यांनी म्हटलं आहे.

महासचिव गेब्रेसुस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जगभरात वाढत असलेल्या करोनाग्रस्तांच्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘करोनाचा उद्रेक झाल्यानंतर आता चार महिन्यांचा काळ लोटला आहे. या विषाणूचा जगात झपाट्यानं होत असलेला प्रसार आणि अतिवेगानं होत असलेला संसर्ग मोठी चिंता वाटत आहे. गेल्या काही आठवड्यापासून आम्ही करोनाच्या वाढीवर लक्ष ठेवत आहोत. प्रत्येक देशात , प्रत्येक प्रदेशात रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. मागील काही आठवड्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दुप्पटीनं वाढली आहे. त्यामुळे काही दिवसात एक दशलक्ष लोकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असून, ५० हजार लोकांना प्राण गमवावे लागतील,”अशी भीती त्यांनी गेब्रेसुस यांनी व्यक्त केली.

मृतांच्या आकडेवारीत चीन चौथ्या स्थानी –

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या करोना माहिती केंद्राने म्हटले आहे की, अमेरिकेत चार हजारावर बळी गेले असून १ लाख ९० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. मंगळवारी अमेरिकेतील मृतांच्या आकडय़ाने ९/११ हल्ल्यातील मृतांची संख्या ओलांडली आहे. अल काईदाने केलेल्या त्या हल्ल्यात अमेरिकेत २००१ मध्ये अंदाजे तीन हजार बळी गेले होते. अमेरिकेत मरण पावलेल्यांची संख्या चीनमध्ये करोनाने घेतलेल्या बळींपेक्षा अधिक झाली आहे. चीन हे या विषाणूचे प्रमुख केंद्र होते. तेथील बळींची संख्या ३३१० होती. जगात या विषाणूने ४२ हजार बळी घेतले असून ८ लाख ६० हजार निश्चित रुग्ण आहेत. चीनमध्ये ८२२९४ रुग्ण असून तो आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे.