करोनामुळे देशातील हॉटेल आणि रेस्तराँ ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद राहणार आहेत असा मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. तुम्हाला जर हा मेसेज खरा वाटत असेल तर तुम्ही एकदा पर्यटन मंत्रालयाने जारी केलेलं स्पष्टीकरण वाचवण्याची गरज आहे. पर्यटन मंत्रालयाने अशा प्रकारचा कोणताही आदेश दिलेला नाही. मंत्रालयाने सोशल मिडियावर व्हायरल होणारे हॉटेल आणि रेस्तराँ बंद ठेवण्याबद्दलचे मेसेज हे पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत असं म्हटलं आहे. इतकचं नाही तर मंत्रालयाने यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारही केली आहे.
हॉटेल आणि रेस्तराँ बंद ठेवण्याबद्दल मंत्रालयाच्या हवाल्याने खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी कोणी दोषी अढळल्यास त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “संबंधित अधिकाऱ्यांकडे अशाप्रकारे खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत,” असं पर्यटन मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर हॉटेल, रेस्तराँ आणि रिसॉर्ट १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत असा मेसेज व्हायरल झाला आहे. अनेकांना व्हॉट्सअॅपवरही हा मेसेज खूप व्हायरल झाला आहे. हे आदेश पर्यटन मंत्रालयाने काढल्याचा दावाही या मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याचे मंत्रालयाने सोशल नेटवर्किंगवरुन स्पष्ट केलं आहे.
Cyber Crime Unit, Mumbai Police has initiated investigation into fake news being circulated in @tourismgoi‘s name. Respective authorities will take action against guilty individuals, including but not limited to initiation of criminal proceedings under relevant laws. pic.twitter.com/u2DBNvx3n6
— Ministry of Tourism (@tourismgoi) April 22, 2020
पीआयबीचे स्पष्टीकरण
व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुनही हॉटेल, रेस्तराँ आणि रिसॉर्ट बंद राहणार असल्याचा मेसेज खोटा असल्याचे ट्विट केलं आहे.
No letter has been issued by @tourismgoi on closing of hotels/restaurants till 15th Oct 2020 amidst #CoronaOutbreak.
It’s a request to all to ignore such messages and only believe the official communication. https://t.co/MjDTVwaX9i— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 22, 2020
मागील काही दिवसांपासून अशाप्रकारे अनेक मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच च्याडब्ल्यूएचओ नावाने भारतातील लॉकडाउनसंदर्भात प्रोटोकॉल नावाने एक मेसेज व्हायरल होत होता. मात्र अशाप्रकारचा कोणताही प्रोटोकॉल आम्ही जारी केला नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटलं होतं.