देशामधील करोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून नागरिकांना घरात राहण्याचेही आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत.  भारतातील ५४८ जिल्हे लॉकडाउन करण्यात आले असून ३० राज्ये सध्या लॉकडाउन आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही अनेकजणांना लॉकडाउन गांभीर्याने घेताना दिसत नाहीयत. रविवारी ‘जनता कर्फ्यू’ला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर सोमवारी अनेक शहरांमध्ये लॉकडाउन असूनही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले. सोशल डिस्टन्सींगला प्राधान्य देत नागरिकांनी घरामध्येच रहावे असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी आता अनेक ठिकाणी थेट संचारबंदीचा निर्णय सरकारी यंत्रणांना घ्यावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासारख्या १३० कोटींची लोकसंख्या असणाऱ्या देशात सोशल डिस्टन्सींगमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळू शकते असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटलं आहे.

नागरिकांनी घरीच थांबून सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर देशातील करोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा ६२ टक्कांनी कमी होईल. तसेच सोशल डिस्टन्सींगमुळे करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांनी कमी करता येईल. त्यामुळे इतर देशांमध्ये वाढत गेलेला करोनाग्रस्तांचा आलेख भारतामध्ये रोखता येईल आणि या साथीवर मात करण्याच्या अधिक संधी यंत्रणांना उपलब्ध होतील, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच महाराष्ट्रातील संचारबंदीचा निर्णय जाहीर केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन गांभीर्याने घ्या असं आवाहन केलं आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. मात्र नागरिकांनी या सगळ्या काळात घरी राहून, स्वयंशिस्त पाळून आम्हाला सहकार्य करा असंही आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रामधील रुग्णांची संख्या १०० हून अधिक

आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, गुजरात, हरयाणा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओदिशा, पुद्दुचेरी, तेलंगण, तामिळनाडू, राजस्थान, चंदीगढ, जम्मू काश्मीर, लडाख या राज्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आहेत. कालपर्यंत ४१८ असलेला ही संख्या आता ५०३ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात ही संख्या सोमवारी ९७ होती होती जी आता  १०१ वर पोहचली आहे.