अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं होतं. या कर्फ्यूला पहाटे सुरूवात झाली आहे. या जनता कर्फ्यूदरम्यान अनेक सेवा बंद राहणार असल्या तरी पेट्रोल पंप मात्र सुरु राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पेरेशनने रविवारी सर्व पेट्रोलपंप सुरु असतील असं जाहीर केलं आहे. मात्र या पेट्रोल पंपांवर कर्मचाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कमी असेल.
पेट्रोल पंपाबरोबरच कंपनीने आपली इतर कामेही नेहमीप्रमाणे सुरु ठेवली असल्याचे जाहीर केलं. यामध्ये रिफायनरीमधील काम, पाइपलाइन्ससंदर्भातील काम आणि मार्केटींगचे काम जैसे थे पद्धतीनेच सुरु असल्याचे कंपीनीने म्हटलं आहे. “देशातील सर्व रिफायनरी मागील एका आठवड्यापासून नेहमीसारख्या १०० टक्के क्षमतेने सुरु आहेत. त्यामुळे कंपनीमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आणि प्रोडक्ट बाजारामध्ये सामान्यपणे उपलब्ध आहेत,” असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
कंपनीने आपल्या स्टेशन डिलर्स, पंपावरील कर्मचारी, एलपीजी पुरवठादार आणि इतर कर्मचारीवर्गाला ग्राहकांच्या कमीत कमी थेट संपर्कात येण्यासंदर्भातील सुचना केल्या आहेत. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करुनच काम करावे असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
कॉर्पेरेट स्तरावर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. तर ज्या राज्यांमध्ये करोनाचा अधिक प्रभाव नाहीय त्या राज्यांमध्ये दिवसाआड कामावर येण्याची मूभा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली आहे.