करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपत आला असला तरी परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाउनसंबधी केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत यावर भाष्य केलं आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवावे असं नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना सांगितलं की, “करोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते तिथे आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. तसंच कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपण योग्य वेळी लॉकडाउनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे”.

आणखी वाचा- पंतप्रधान मोदी म्हणतात, “तोंडवरील मास्क होणार आपल्या आयुष्याचा भाग”

“लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. करोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “ दो गज दूरी” हा आपल्या जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. तसंच लॉकडाउनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

“आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वारांटाईन करायचे आहे. एका बाजूला आपल्याला करोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- मोदी सरकारची नवी नीती: लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असे धोरण बनवा

“पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी . मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत,”असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- Coronavirus : सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळंच – पंतप्रधान

“येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. असे झोन्स फुल प्रुफ करा.  ज्या राज्यांत करोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान  आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका,” असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.

आणखी वाचा- “भारतावरचे संकट टळलेले नाही”, नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्री बैठकीतील महत्त्वाचे २० मुद्दे

“करोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात दुर्लक्ष नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेतच. ज्या क्षेत्रांमध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत त्याचा अभ्यास करा,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “लॉकडाउनच्या एकत्रित प्रयत्नांचा फायदा होतोय”, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राज्यांचं कौतुक

“ रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता,”असंही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown pm narendra modi meeting with cm to discuss situation sgy
First published on: 27-04-2020 at 15:23 IST