पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला असल्याचं सांगताना नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव होत असताना काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनसंबंधी पुढील धोरण ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, “सर्व मुख्यमंत्र्यांशी माझी वैयक्तिक स्तरावर चर्चा होत असते. पण एकत्रित संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे”. १४ एप्रिल रोजी लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारनं त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याची घोषणा केली होती. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपत आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढत आहे. दुसरीकडं आर्थिक संकटही डोकं वर काढायला लागलं असून, ३ मे नंतर काय होणार याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा- लॉकडाउन कुठे कडक आणि कुठे शिथिल करणार? नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

बैठकीदरम्यान नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं मांडत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सहभागी झाले होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ज्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे तिथे योग्य ती काळजी घ्यावी असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. करोना व्हायरससोबतचं हे युद्ध दीर्घकाळ चालणारं असून धीर ठेवला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

यापूर्वी २० मार्च रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्याचं आवाहन केलं होतं. याव्यतिरिक्त त्या बैठकीत करोनाचा सामना करण्यासाठी राज्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, यावर चर्चाही केली होती.

आणखी वाचा- “भारतावरचे संकट टळलेले नाही”, नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्री बैठकीतील महत्त्वाचे २० मुद्दे

११ एप्रिल रोजी झाली होती चर्चा
लॉकडाउनचा पहिला टप्पा १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला. त्यापूर्वी ११ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसंच या बैठकीत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्या बैठकीत सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा कल लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याकडे होता. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown pm narendra modi video conference meeting with cms sgy
First published on: 27-04-2020 at 13:26 IST