आपण करोनाला हरवू शकत नाही असं वक्तव्य आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केलं आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हा इशारा दिला आहे. करोना काळातून सावरण्यासाठी आता अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशात WHO च्या महासंचालकांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली. दुबई मध्ये एका हेल्थ फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

WHO ने गेल्याच आठवड्यात करोना व्हायरसची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा दिला होता. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लोक लॉकडाउनला कंटाळले आहेत. COVID 19 मुळे आतापर्यंत जगभरात ४ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात लाखो लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. अमेरिका, आशिया खंडातल्या काही भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यूरोपमध्ये प्रतिबंधात्मक उपायही सुरु करण्यात आले आहेत.

या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मात्र यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं आहे. सध्याच्या घडीला हा रोग जगभरात त्याचे पाय पसरतो आहे. दुबईत झालेल्या व्हर्चुअल फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आपल्याला ठाऊक आहे की करोना ही एक महामारी आहे. या महामारीमुळे आरोग्याचं संकट सगळ्या जगावर ओढावलं आहे. इतकंच नाही तर आर्थिक संकट, सामाजिक संकट आणि अनेक देशांवर राजकीय संकटही ओढावलं आहे. करोनाचा परिणाम येणाऱ्या दशकांवर पाहण्यास मिळेल असंही WHO चे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.