सध्या जगभरात करोना व्हायसरने थैमान घातला असून प्रत्येक देश आपल्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक देशांचे सर्वोच्च नेतेही करोनाची लागणी होऊ नये यासाठी काळजी घेताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नुकताच याचा प्रत्यय दिला. एरव्ही भेट झाल्यावर हस्तांदोलन करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांना नमस्ते करत स्वागत केलं. बुधवारी लिओ वराडकर व्हाईट हाऊसमध्ये आले होते. सध्या करोनाने थैमान घातला असल्याने हे करणं गरजेचं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

पत्रकारांनी डोनाल्ड ट्रप्म आणि मूळ भारतीय वंशाचे असणारे लिओ वराडकर यांनी तुम्ही एकमेकांना अभिवादन कसं केलं असं विचारलं असता दोघांनीही हात जोडून नमस्ते करुन दाखवलं. “आम्ही हस्तांदोलन केलं नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि आता काय करायचं असं एकमेकांना विचारलं. हे थोडं विचित्र होतं,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

यावेळी एका पत्रकाराने तुम्ही हस्तांदोलन केलं का ? अशी विचारणा केली असता लिओ वराडकर यांनी दोन्ही हात जोडत पत्रकारांना आपण अशा पद्धतीने अभिवादन केल्याचं सांगितलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील नमस्ते करुन दाखवलं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय संस्कृतीचं कौतुक –
“मी नुकताच भारत दौऱ्यावरुन परतलो आहे. मी तिथे हस्तांदोलन केलं नाही, आणि हे फार सोपं होतं. कारण ती त्यांची संस्कृती आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानी संस्कृतीचंही कौतुक केलं. भारत आणि जपानमधील संस्कृती काळाच्या पुढील आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला हस्तांदोलन करण्यास जास्त आवडत नाही. पण एकदा तुम्ही राजकारणी झालात की, हस्तांदोलन करणं नित्याचा भाग होऊन जातो. जेव्हा लोक समोरुन चालत येतात आणि Hi म्हणतात तेव्हा खूप वेगळंच वाटतं. हे काहीतरी भलतंच वाटतं. तसंच तुम्ही समोरील व्यक्तीशी उद्धट वागत असल्यासारखं दिसतं. पण पुढील काही आठवडे याबद्दल विचार न केलेलाच बरा,” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं..