पीटीआय, नवी दिल्ली
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आणि औषध सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली असून, या घटनांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय न्यायिक आयोग किंवा तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूंबाबत सर्व प्रलंबित ‘एफआयआर’ आणि तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
पंजाबमध्येही बंदी
गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडनंतर पंजाबने कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर बंदी आणली आहे.