Punjab ex-DGP Mohammad Mustafa Son Death Case: पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी, माजी मंत्री रझिया सुलताना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एकेकाळी पंजाबमध्ये अंमली पदार्थांविरोधातील लढाईचे नेतृत्व केल्यामुळे त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अंमली पदार्थाच्या विरोधातील खरी लढाई ते स्वतःच्या घरातच लढत होते. काही दिवसांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मोहम्मद मुस्तफा वादाच्या भोवऱ्यात अडकले. नुकतेच त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना आपल्या मनातील दुःखाला वाट मोकळी करून दिली.
मी दहशतवाद्यांचा सामना करू शकतो, पण…
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोहम्मद मुस्तफा म्हणाले, “मी दहशतवाद्यांचा सामना करू शकतो, पण माझ्या व्यसनाधीन मुलाचा सामना करू शकलो नाही. मागच्या १८ वर्षांत आम्ही नरकयातना भोगल्या. या काळात मी माझे आई, वडील आणि बहीण गमावली. पण मुलगा गमावण्याचे दुःख सर्वात वाईट आणि तीव्र आहे.”
मुलगा अकील अख्तर याला व्यसनाधीनतेच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी १८ वर्ष संघर्ष केला. याबद्दल मुस्तफा यांनी माहिती दिली. त्यांनी मुलगा तर गमावलच. शिवाय त्यांच्यासह पत्नी आणि काँग्रेसच्या माजी कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांच्यावर मुलाच्या हत्ये प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे.
वडील म्हणून पराभूत झालो
“मी एसटीएफ प्रमुख असताना राज्यभरात आणि माझ्या स्वतःच्या घरात अमली पदार्थाविरोधात लढाई लढली”, असे मुस्तफा म्हणाले. २०१८ साली माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या काळात त्यांच्यावर अमलीपदार्थाविरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष कार्य दलाचे प्रमुखपद देण्यात आले होते. “पोलीस अधिकारी म्हणून मी कोणत्याही मोहिमेत अपयशी ठरलो नाही. पण वडील म्हणून मी हरलो”, असे दुःख मुस्तफा यांनी व्यक्त केले.
नववीपासून मुलगा व्यसनाच्या जाळ्यात अडकला
मुलगा अकील अख्तर व्यसनाधीनतेच्या जाळ्यात कसा अडकला? याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, २००७ साली देहरादून येथील शाळेत नववीत शिकत असताना मला एका मित्राने सांगितले की, अकील शाळेची भिंत ओलांडून बाहेर जात आहे आणि मित्रांबरोबर हुक्का पित आहे. यानंतर त्याला शाळेतून काढून टाकले गेले. मी आणि पत्नी रझियाने विनवणी केल्यानंतर त्याला शाळेत घेतले गेले. पण सहा महिन्यांनी पुन्हा त्याला शाळेतून काढले. या घटनेनंतर चंदीगड, पंचकुला येथील अनेक शाळांमधून त्याला वारंवार काढले गेले.
“तो हुशार मुलगा होता. एकदा त्याने प्रतिष्ठित विधी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती. २०२१ साली त्याने विधी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पदवीही घेतली. त्याने नामांकित वकिलांबरोबर प्रॅक्टिस करावी, यासाठी मी अनेकांकडे शब्द टाकला. पण तो कधीही कुणाबरोबर टिकला नाही”, असेही मोहम्मद मुस्तफा यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती केंद्रात अनेकदा टाकूनही अपयश
मुलाला अनेकदा व्यसनमुक्ती केंद्रात टाकले होते. मागच्या वर्षीच त्याला पतियाळा येथील पुनर्वसन केंद्रात दुसऱ्यांदा टाकले होते. तिथे काही आठवड्यात त्याच्यात बदल व्हायचा. मात्र याकाळात आई रझिया नैराश्यात जायची. तिला झोप लागत नसे. मग आम्ही त्याला पुन्हा घरी आणत असू.
सीबीआयच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल
१६ ऑक्टोबर रोजी अकीलचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला. काही लोक हे आमचे षडयंत्र असल्याचे सांगत आहेत. एक वडील म्हणून मला किती दुःख होत आहे, हे मी सांगू शकत नाही. पण आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे, याचे मी स्वागत करतो. सीबीआयच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि आमचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.
