बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कंगना रणौत आपल्या बिनधास्त विधानांसाठी ओळखली जाते. तिचे अनेक विधानं वादग्रस्तही ठरत असतात. नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं वादग्रस्त विधानं केली आहेत. ‘भारताला २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले’, असे विधान काही काळापूर्वी कंगना रणौतने केले होते. त्या विधानावरून तिला ट्रोलही करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कंगना रणौतने याच विधानावर भाष्य केलं आहे. टाइम्स नाऊ समिट २०२४ मध्ये बोलताना कंगना रणौत म्हणाली, “होय, २०१४ रोजीच भारताला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी त्यांनी युक्तिवादही केला. तसेच जे लोक ट्रोल करतात, त्यांनी समोर येऊन चर्चा करावी.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाली कंगना रणौत?

टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कंगना रणौत म्हणाली, “मी काहीही चुकीचं बोलले नव्हते. शरीराने स्वतंत्र्य होण्यालाच आपण स्वातंत्र्य मानतो का? तसे मानले तर आपण पारतंत्र्यात कधीच नव्हतो. कारण इंग्रजांनी आपल्याला तुरुंगात डांबलं नव्हतं. ते तर भारताला आपली वसाहत असल्याचे सांगत होते. कुणाच्याही शरीराला त्यांनी साखळदंडाने बांधले नव्हते. आपल्या देशात त्यांचे कायदे होते. आपण पारतंत्र्यात कसे होतो? हे मी सांगते. आपण विचाराने पारतंत्र्यात होतो. आपल्याला स्वतःचे लोक निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. १९४७ नंतर देशात विदेशी शासन होते. आपली धोरणे विदेशातून ठरत होती. आपल्याला धर्माचे आचरण करता येत नव्हते. हिंदू असणे ही शरमेची बाब वाटत होती.”

“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

स्वातंत्र्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना कुणी परागंदा केलं

जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे गेले? त्यांना कोणी नष्ट केलं? ज्या व्यक्तीने स्वतःचे रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. जपान ते जर्मनी प्रवास करून भारताला स्वतंत्र देश असल्याचं घोषित केलं, त्याला भारतात उतरू दिलं नाही. उलट जे लोक तुरुंगात बसून टीव्ही पाहत होते, ते नंतर या देशाचे सरकार चालवू लागले. स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता गेली, ते ब्रिटिशांचे पुढचे वारसदार होते, हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकते, असेही आव्हान कंगना रणौतने दिले.

म्हणून सरदार वल्लभभाई पंतप्रधान झाले नाहीत

आपण तेव्हा पारतंत्र्यातच होतो, यासाठी माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. आपल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना बेपत्ता केलं गेलं. आझाद हिंद सेनेचे लोक उपाशी मारले गेले. त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरून दिसतं की, आपल्याला स्वातंत्र्य २०१४ रोजी मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नव्हतं म्हणून पंतप्रधान केलं गेलं नाही, असाही दावा कंगना रणौतने यावेळी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Country got independence in the year 2014 kangana ranaut stands by the old statement says have proof kvg
First published on: 28-03-2024 at 16:08 IST