बॉम्ब तयार करण्यात हातखंडा असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अब्दुल करीम टुण्डा याची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी द्यावी, ही पोलिसांनी केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. आपले वय आणि आरोग्याच्या तक्रारींचे कारण देत टुण्डा याने ब्रेन मॅपिंग चाचणीला विरोध दर्शविला होता. टुण्डा याला गुरुवारी मुख्य महानगर दंडाधिकारी अमित बन्सल यांच्यासमोर हजर करण्यात आले. सध्या आपले वय ७२ असून आपल्याला विविध विकारही जडले आहेत. आपल्या शरीरात एक पेसमेकरही बसविण्यात आला असून उच्च रक्तदाबाचाही आपल्याला विकार आहे. त्यामुळे या स्थितीत आपण ब्रेन मॅपिंग चाचणीला तयार नाही, असे टुण्डा याने म्हटले आहे. या नकाराचे काय परिणाम होतील त्याची आपल्याला कल्पना आहे, तरीही आपण ब्रेन मॅपिंग करण्यास नकार देत आहोत, असे टुण्डा म्हणाला. टुण्डाच्या दहशतवादी जाळ्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, अशी विनंती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयाला केली होती.