कोव्हॅक्सिनला अखेर मान्यता; ‘डब्ल्यूएचओ’च्या परवानगीमुळे भारतीय लसवंतांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर

कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे भारत बायोटेकने जूनमध्ये जाहीर केले होते.

‘डब्ल्यूएचओ’च्या परवानगीमुळे भारतीय लसवंतांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर

भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)अखेर बुधवारी मंजुरी दिली. या निर्णयामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर देशाच्या लसीकरण मोहिमेत या लशीचा वापर करण्यात आला. देशात सहा लशींना आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्डबरोबरच कोव्हॅक्सिनच्या लसमात्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.

कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे भारत बायोटेकने जूनमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर या लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळावी, यासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्जासह चाचण्यांचा तपशील पाठवला होता. ‘डब्ल्यूएचओ’च्या तज्ज्ञ समितीने अनेक बैठकांमध्ये भारत बायोटेकच्या प्रस्तावावर चर्चा केली होती. मात्र, लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया डावलून कोव्हॅक्सिनला घाईघाईत मंजुरी देता येणार नाही, असे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले होते. भारत बायोटेकने लशीसंदर्भातील आवश्यक तपशील लवकरात लवकर सादर केल्यास ही प्रक्रिया वेगाने होईल, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले होते.

‘डब्ल्यूएचओ’च्या तांत्रिक सल्लागार गटाने २६ ऑक्टोबरला भारत बायोटेककडे लशीबाबत आणखी तपशील मागवला होता. संघटनेच्या परवानगीविना कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीय नागरिकांच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले होते. कोव्हॅक्सिनच्या मंजुरीची प्रतीक्षा लांबल्याने परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या या लसवंतांमध्ये अस्वस्थता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेनिमित्त नुकतीच ‘डब्ल्यूएचओ’च्या संचालकांची भेट घेतली होती.

अखेर तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीनंतर ‘डब्ल्यूएचओ’ने कोव्हॅक्सिन लशीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. ‘कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापराच्या लसयादीत समावेश करण्यात आल्याबद्दल भारताचे अभिनंदन’, असे ट्विट ‘डब्ल्यूएचओ’च्या विभागीय संचालक डॉ. पूनम सिंह यांनी केले.

या निर्णयाबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ‘डब्ल्यूएचओ’चे आभार मानले. हे देशाचे समर्थ नेतृत्व आणि मोदीजींच्या निर्धाराचे प्रतीक असून, जनतेचा विश्वास आणि आत्मनिर्भर भारताचाही त्यातून प्रत्यय येतो, अशी प्रतिक्रिया मंडाविया यांनी व्यक्त केली.

लशीचा वैधता कालावधी एक वर्ष

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने कोव्हॅक्सिन लशीचा वैधता (वापराची मुदत) कालावधी १२ महिने केल्याचे भारत बायोटेकने बुधवारी स्पष्ट केले. कोव्हॅक्सिन लशीच्या विक्री व वितरणास परवानगी देताना लशीच्या वापराची मुदत निर्मितीच्या तारखेपासून सहा महिने निश्चिात करण्यात आली होती. त्यानंतर ती नऊ महिने आणि आता ती १२ महिने करण्यात आली आहे.

‘लसीकरण घरोघरी’

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी राबविण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. त्यानुसार राज्य सरकारने अशी मोहीम राबविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. कमी लसीकरण झालेल्या देशभरातील ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covaxin finally recognized who easy way to travel abroad akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या