कोवॅक्सिन लस फक्त ५० टक्केच प्रभावी? लान्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष!

लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोवॅक्सिन लस ५० टक्के प्रभावी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

covaxin vaccine effectiveness lancet journal.jpeg
लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोवॅक्सिन लस ५० टक्के प्रभावी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारतात सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ हैदराबादमधील भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोवॅक्सिन लसीला देखील केंद्र सरकारने आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली. नुकतीच कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य परिषदेने देखील मंजुरी दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनचा वापर होण्यातील अडथळा दूर झाला आहे. मात्र, लान्सेट नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून कोवॅक्सिन लसीबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. यानुसार, अभ्यासासाठी तपासण्यात आलेल्या व्यक्तीसमूहामध्ये कोवॅक्सिन फक्त ५० टक्केच प्रभावी ठरल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

२ हजार ७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास

लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या अभ्यासासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील एकूण २ हजार ७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना करोनाची लक्षणं जाणवत होती आणि त्यांनी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते. अभ्यासासाठी करण्यात आलेल्या चाचण्यांनंतर कोवॅक्सिनचे दोन डोस या कर्मचाऱ्यांवर ५० टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं.

कोवॅक्सिनचे दोन डोस झाल्यानंतर चाचण्या

हा अभ्यास प्रामुख्याने देशात करोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना करण्यात आला. यादरम्यान, आढळणाऱ्या एकूण करोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरिएंटने बाधित होताना दिसत होते. या काळात करोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने अभ्यासासाठी घेण्यात आले होते. या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते.

काय आले निष्कर्ष?

१६ जानेवारीपासून देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाला सुरुवात झाली. एम्सनं आपल्या २३ हजार कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस दिले. सदर अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या २ हजार ७१४ कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ६१७ कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना करोनाची बाधा झाल्याचं दिसून आलं.

लस प्रभावी ठरण्याचं प्रमाण कमी का?

दरम्यान, फक्त ५० टक्के प्रभावी ठरण्याची काही कारणं देखील अभ्यासामध्ये देण्यात आली आहेत. यातल्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चाचण्या लस घेतल्याच्या पहिल्या २० दिवसांमध्ये करण्यात आल्या. तसेच, करोना सर्वात गंभीर स्वरुपात असताना हा अभ्यास केला गेला. शिवाय, हा अभ्यास करोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या हाय रिस्क अशा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वोच्च पातळीवर असताना हा अभ्यास करण्यात आला होता. शिवाय, त्या काळात डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्यामुळे लस प्रभावी ठरण्याचं प्रमाण कमी आढळलं असण्याची शक्यता अभ्यासात नमूद करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covaxin vaccine effectiveness lancet journal study aiims health care workers pmw

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या