नवी दिल्ली : करोना मृत्यूंचे आकडे सरकार लपवित असल्याची टीका होत असतानाच मंगळवारी मध्यप्रदेशात प्रत्यक्ष मृत्यूंची संख्या वाढलेली दिसली. असे असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र नागरी नोंदणी यंत्रणा (सीआरएस) व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) यांच्याकडील आकडय़ांची तुलना करून प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. हे आकडे केवळ आडाखे व कल्पनात्मक पातळीवरचे आहेत अशी टीका सरकारने केली आहे.

करोनामुळे झालेले मृत्यू हे एचएमआयएस व सीआरएस यांची तुलना करता वेगळे असून प्रत्यक्षात सांगण्यात आले त्यापेक्षा जास्त आहेत, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. सीआरएस व एचएमआयएस यांच्या तुलनात्मक अभ्यासातून जे दिसून आले त्याच्या आधारे मृत्युसंख्येबाबत प्रसारमाध्यमांनी चुकीच्या बातम्या दिल्या आहेत. त्या कपोलकल्पित असून त्याला कुठलाही ठोस आधार नाही. एचएमआयएस व सीआरएस या प्रणालीत दिलेल्या माहितीची तुलना करून त्यातून अर्थ लावणे चुकीचे आहे. एचएमआयएसमध्ये दिलेले माहितीनुसार मृतांची संख्या जास्त दिसत असली तरी या मृत्यूंचे कारण तेथे दिलेले नाही. त्यामुळे ते करोनामुळे झाले असल्याचे प्रसारमाध्यमांनी यात गृहीत धरले आहे. प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार २ लाख ५० हजार मृत्यूंचे कारण समजलेले नाही. केंद्राने म्हटले आहे, की करोना माहितीबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे निदान मृत्यूंची संख्या तरी योग्य प्रकारे देणे गरजेचे आहे. करोना मृत्यूंची नोंद करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने घालून दिली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने त्यासाठी ‘आयसीडी १०’ हे निकष लागू केले आहेत.