Corona New Variant: करोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने (Omicron variant) पुन्हा एकदा संपूर्ण जगात भीती निर्माण केली आहे. यानंतर जगभरातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) वेगवेगळे निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी आणली असून काहींनी क्वारंटाइन (Quarantine) होण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान जगभरातून लावण्यात आलेल्या या निर्बंधांमुळे दक्षिण आफ्रिकेने नाराजी जाहीर करत दु:ख व्यक्त केलं आहे. करोनाच्या नव्या विषाणूची ओळख पटवल्याची शिक्षा आम्हाला मिळत असल्याचं दक्षिण आफ्रिकेने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Covid 19: ‘ओमिक्रॉन’चा धोका वाढत असल्याने महाराष्ट्रात कठोर निर्णय?; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

करोनाचा नवा विषाणू B.1.1529 याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी करोनाचा विषाणू चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. या नव्या विषाणूला ओमिक्रॉन नाव देण्यात आलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, करोनाचा हा नवा विषाणू इतरांच्या तुलनेत जास्त संक्रमित असल्याचं सांगितलं जात आहे.

विषाणूच्या नव्या प्रकारामुळे परदेशी प्रवाशांसाठी नियमावली

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जे लोक इंग्लंडमध्ये परतत आहेत त्यांना पीसीआर टेस्ट अनिवार्य असून रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहावं लागेल असं सांगितलं आहे. जर कोणाला नव्या विषाणूची लागण झाली असेल तर त्याच्या निकटवर्तीयांना १० दिवस विलगीकरणात राहावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

Covid 19: ‘ओमिक्रॉन’ने जगभरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं असताना ICMR चं मोठं वक्तव्य

ब्रिटनसोबत इतर देशांकडूनही निर्बंध

ओमिक्रॉनच्या भीतीमुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकी देशांतील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिल्यानंतर युरोपीय महासंघातील देश, ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, इराण, जपान, थायलंड आणि अमेरिकेनेही दक्षिण आफ्रिकी देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंधने घातली आहेत. बेल्जियम, इस्रायल, जर्मनी, हाँगकाँग आणि ब्रिटनमध्येही ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून जर्मनीत दाखल झालेल्या दोन विमानांतील ६१ प्रवासी बाधित आढळले आहेत.

दक्षिण आफ्रिकेने व्यक्त केली नाराजी

जगभरातून निर्बंध लावण्यात येत असल्याने दक्षिण आफ्रिकेने नाराजी व्यक्त केली आहे. वेगाने फैलाव करणाऱ्या या विषाणूची ओळख पटवल्याची शिक्षा आम्हाला दिली जात असल्याचं दक्षिण आफ्रिकेने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य विभागाने (DIRCO) जगभरातील नेत्यांना आमच्यावर निर्बंध लावू नयेत असं आवाहन केलं आहे.

प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांवर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, “अॅडव्हान्स जिनोमिक सिक्वेंसिंग आणि नव्या विषाणूची ओळख पटवल्याची शिक्षा मिळत आहे. विज्ञानाचं कौतुक केलं पाहिजे, याउलट शिक्षा दिली जात आहे”.

DIRCO ने अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या केसेस समोर येत असून यामधील अनेक प्रकरणांचा दक्षिण आफ्रिकेसोबत कोणताही संबंध नसल्याचंही लक्षात आणून दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रवासावार बंदी आणणाऱ्या युकेसहित अनेक देशांवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 new omicron variant south africa complained being punished instead of applauded sgy
First published on: 28-11-2021 at 12:32 IST