मेरठमध्ये करोनामुळे एकाच दिवशी दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही केवळ २४ वर्षांचे होते. जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी अशी या दोन भावांची नावं आहेत. २३ एप्रिल रोजी दोघांचा २४ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ताप आला आणि नंतर ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोघांचे वडील ग्रेगरी रेमंड राफेल यांनी २३ एप्रिल १९९७ रोजी त्यांची पत्नी सोजा हिने दोन बाळांना एकाच वेळी जन्म दिला होता तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतोय. सोजा यांनी जुळ्या बाळांना जन्म दिल्याचं रुग्णालयामधून कळवण्यात आल्यानंतर राफेल तातडीने त्या तिघांना भेटण्यासाठी गेले होते. दोघांही अगदी सारखेच दिसत होते. त्यानंतर या दोन्ही भावांनी एकत्र शिक्षण घेतलं, दोघेही कंप्युटर इंजिनियर झाले, दोघांनाही हैदराबादमध्ये नोकरी लागली. दोघांनाही करोनाची लक्षणं एकाच दिवशी दिसून आली आणि करोनाविरुद्धचा त्यांचा लढाही एकाच काही तासांच्या अंतराने संपला.

आणखी वाचा- करोनाविषयी बोललं, तर देशद्रोहाच्या गुन्ह्याचा इशारा; भाजपा आमदाराची योगी सरकारवर टीका

राफेल यांनी आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू करोनामुळे होईल असं कधी वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिलीय. दोघेही एकत्र घरी येतील असा विश्वास आम्हाला होता असं राफेल म्हणाले. “जे एकाला व्हायचं तेच दुसऱ्यालाही व्हायचं. त्यांच्या जन्मापासूनच ते दोघे असे होते. आम्हाला जेव्हा जोफ्रेडच्या मृत्यूचं वृत्त समजलं तेव्हाच मी माझ्या पत्नीला राल्फ्रेड एकटा घरी येणार नाही असं म्हटलं होतं. जोफ्रेडचा मृत्यू १३ मे रोजी तर राल्फ्रेडचा १४ मे रोजी झाला. दोघांच्या मृत्यूमध्ये अवघ्या काही तासांचं अंतर होतं,” असं राफेल म्हणाले.

“त्या दोघांनी भविष्यात काय करायचं याबद्दल बरंच काय काय ठरवून ठेवलं होतं. आम्हाला अधिक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी ते धडपडत होते. शिक्षक म्हणून आम्ही त्या दोघांना लहानाचं मोठं करताना मोठ्या खस्ता खाल्ल्या आहेत. आम्ही खर्च केलेल्या पैशांपासून आनंदापर्यंत सारं काही त्यांना आम्हाला परत करायचं होतं. त्या दोघांनी कोरिया आणि जर्मनीमध्ये कामासाठी जाण्याचा विचार केला होता. मात्र देवाने आम्हाला अशी शिक्षा का दिली, काहीच कळत नाही,” असं राफेल म्हणाले. राफेल दांपत्यांला नेलफ्रेड हा तिसरा मुलगाही आहे.

आणखी वाचा- छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

मेरठमधील कॅनॉनमेंट परिसरामध्ये राहणाऱ्या राफेल कुटुंबियांनी जोफ्रेड आणि राल्फ्रेडवर सुरुवातीला घरीच उपचार केले. साधा ताप असेल असं कुटुंबियांना वाटलं होतं. “आम्ही ऑक्सिमीटर घेतला होता. मात्र त्या दोघांची ऑक्सिजन लेव्हर ९० पर्यंत खाली आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. आम्ही त्यांना एक मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल केलं,” असं राफेल यांनी सांगितलं. करोना चाचणी केली असता दोघांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र काही दिवसांनंतर दोघांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली होती, असंही राफेल सांगतात. “दोघांनाही कोव्हिड वॉर्डमधून सामान्य आयसीयूमध्ये हलवण्याचा विचार डॉक्टर करत होते. मात्र त्या दोघांना दोन दिवस कोव्हिड वॉर्डमध्ये ठेऊन त्यांच्या प्रकृतीमध्ये काही चढ उतार होतोय का हे पहावं अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र अचानक १३ मे रोजी जोफ्रेडचा मृत्यू झाल्याचा कॉल आम्हाला रुग्णालयातून आला,” असं राफेल सांगतात.

राल्फ्रेडने त्याच्या आईला जॉफ्रेडचा मृत्यू झाला त्या दिवशीच शेवटचा कॉल केला होता. “तो रुग्णालयातील बेडवरुन बोलत होता. त्यांचा आवाज जरा घाबरल्यासारखा वाटत होता. आपण रिकव्हर होत असल्याचं त्याने आईला सांगितलं. तसेच जोफ्रेडच्या तब्बेतीचीही त्याने चौकशी केली. पण जोफ्रेडचा त्यापूर्वीच मृत्यू झाल होता. जोफ्रेडला आपण दिल्लीच्या रुग्णालयात हलवल्याचं आम्ही त्याला सांगितलं. मात्र त्याला काय ते लगेच कळलं. तो त्याच्या आईला तू खोटं बोलतेस असं सांगून रडू लागला,” असंही राफेल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 twin brothers both techies die together after 24th birthday scsg
First published on: 18-05-2021 at 11:32 IST