केरळातील सत्ताधारी माकपचे राज्य सचिव कोडियारी बालकृष्णन यांचे पुत्र बिनॉय विनोदिनी बालकृष्णन यांच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. बिहारमधील तेहतीस वर्षांच्या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला असून ही महिला माजी बार नर्तिका आहे. बालकृष्णन याने आपल्यावर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला असून त्यांच्यापासून मूल झाले आहे अशी तक्रार सदर महिलेने केली आहे.
या महिलेला ओळखत असल्याचे बिनॉय यांनी कबूल केले असून आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. सहा महिन्यांपूर्वी या महिलेने पत्र पाठवून पाच कोटी रुपयांची मागणी केली होती व तुमच्याशी माझा विवाह झाला होता व त्यातून एक मूलही झाले आहे असा आरोप या महिलेने केल्याचे बिनॉय यांनी तिरुअनंतपूरम येथे दूरचित्रवाणी वाहिन्यांना सांगितले.
बिनॉय यांनी सांगितले की, २००८ मध्ये माझा विवाह झालेला आहे त्यामुळे त्यात लपवून ठेवण्यासारखे काही नाही. ही महिला ब्लॅकमेल करीत आहे. मे महिन्यात या महिलेविरोधात कन्नूर येथील पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. नंतर ती तक्रार तत्कालीन कन्नूर पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आली होती. लोकसभा निवडणुका सुरू असल्याने व हद्दीच्या वादातून यात काही कारवाई करण्यात आली नाही असे पोलिसांनी म्हटले आहे. बिनॉय यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. या प्रकरणात कायदेशीर लढाई लढण्यास मी तयार आहे. त्या महिलेच्या तक्रारीवरून बिनॉय यांच्यावर फसवणूक, बलात्कार असे गुन्हे दाखल केल्याचे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पसालवाड यांनी सांगितले.
तक्रारदार महिला दुबईत नर्तकीचे काम करीत असताना बिनॉय यांच्या संपर्कात आली होती. नंतर बिनॉय हे सतत तिला भेटत राहिले, त्यांचे संबंध वाढत गेले. नंतर बिनॉय यांनी तिला नाचण्याचे काम सोडण्यास सांगितले व लग्नाचे आश्वासन दिले. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, २०१० मध्ये बिनॉय यांनी मुंबईत अंधेरी येथे भाडय़ाने सदनिका घेतली. तेथे तो नेहमी मला भेटत असे. गेल्या वर्षी बिनॉयचा आधीच विवाह झाल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर संबंध बिघडले.
गेल्या वर्षी बिनॉय याच्यावर दुबई न्यायालयाने आखातातील जॅस टूरिझम कंपनीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार प्रवास बंदी लागू केली होती. त्यांनी या कंपनीला १३ कोटींना गंडा घातला आहे.