२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंच चांगली कामगिरी केली आहे. सध्या ९ गुणांसह धोनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवलेल्या भारताला अफगाणिस्तानविरोधात विजयासाठी संघर्ष करावा लागला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विजय खेचून आणला. याच सामन्यात फलंदाजीदरम्यान महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या संथ खेळावर अनेक माजी खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

गुरुवारी मँचेस्टरच्या मैदानावर भारतासमोर वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. या सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान पक्कं करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा मावळल्या असल्या तरीही ते इतरांसाठी अजुनही धोकादायक ठरु शकतात. साखळी फेरीत भारताने अद्यापही ४ सामने बाकी आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ५२ चेंडूत केलेल्या २८ धावांच्या खेळीनंतर भारतीय संघ व्यवस्थापन धोनीचं फलंदाजीतलं स्थान बदलण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार केदार जाधव किंवा हार्दिक पांड्या यांच्यापैकी एका फलंदाजाला धोनीच्या जागेवर बढती मिळण्याची शक्यता आहे.

सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीनंतर डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत भारतीय संघात दाखल झाला आहे. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली अजुनही पंतला अंतिम संघात स्थान देण्याच्या तयारीत नाहीये. विजय शंकरला विश्रांती देण्याची वेळ आली, किंवा त्याला दुखापत झाली तर ऋषभ पंतला संघात जागा मिळण्याची संधी आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात फिरकी गोलंदाजांविरोधात खेळताना भारताचे फलंदाज चाचपडताना दिसले. विंडीजच्या संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा आहे, त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजी विंडीजच्या माऱ्याचा कसा सामना करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.