वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडने विजयी सलामी नोंदवली आहे. ३१२ धावांचे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २०७ धावांवर संपुष्टात आणत यजमान इंग्लंडने विजय मिळवला. बेन स्टोक्सने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडला सहजपणे विजय मिळवता आला. यावेळी बेन स्टोक्सने क्षेत्ररक्षण करताना एक भन्नाट झेल घेतला. हवेत उंच उडी मारुन बेन स्टोक्सने घेतलेला झेल पाहून काही काळ प्रेक्षकही अचंबित झाले होते.

प्रथम फलंदाजी करत इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण आफ्रिकेचा डाव अवघ्या २०७ धावांत कोलमडला आणि इंग्लंडने १०४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. इंग्लंडला सहज विजय मिळाला तरी सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे बेन स्टोक्सने घेतलेल्या अफलातून झेलची.

झालं असं की, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फेहलुकवाया याने ३४ व्या ओव्हरच्या सुरुवातीलाच चेंडू सीमारेषेच्या दिशेने टोलावला. हवेत असणारा चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात असतानाच तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असणाऱ्या बेन स्टोक्सने हवेत उडी मारत चक्क एका हाताने झेल पकडला. हा झेल पाहून फक्त प्रेक्षकच नाही तर इंग्लंड संघातील इतर खेळाडूही आश्चर्यचकित झाले.

या सामन्यात बेन स्टोक्सची कामगिरी सर्वात उत्तम ठरली. त्याने फलंदाजी करताना ७९ चेंडूंत ९ चौकारांसह ८९ धावा फटकावल्या तर गोलंदाजी करत दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय क्षेत्ररक्षणातही आपली छाप पाडली.