लीड्स : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान हे अद्याप टिकून असले तरी एक चूक त्यांच्यासाठी महागात पडू शकते. बेभरवशाचा संघ म्हणून क्रिकेट जगतामध्ये शिक्का बसलेल्या पाकिस्तानचा सामना अनपेक्षित कामगिरीची क्षमता असणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

स्पर्धेच्या पहिल्या चार सामन्यांपैकी तीन पराभव आणि एका अनिकाली सामन्यामुळे पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे होती. परंतु पाकिस्तानने झोकात पुनरागमन करताना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडवर मात करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राखल्या आहेत. इंग्लंड संघाच्या दोन पराभवांमुळे १९९२च्या विश्वविजेत्या पाकिस्तानला बाद फेरीत स्थान मिळवता येऊ शकते. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने मिळवलेल्या विश्वविजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्फराज अहमदचा संघ उत्सुक आहे.

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानने सहा गडी राखून दमदार विजय मिळवला. या सामन्यातील सकारात्मकता पाकिस्तानसाठी महत्त्वाची ठरू शकेल. बाबर आझमचे शतक आणि शाहीन आफ्रिदीचे पाच बळी हे योगदान विजयात महत्त्वाचे ठरले. पाकिस्तानने सात सामन्यांपैकी तीन विजय मिळवले आहेत, तर एक सामना अनिकाली ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर सात गुण जमा आहेत. आता अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकल्यास पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या आशा ठेवता येतील.

सामना क्र. ३६

पाकिस्तान वि. अफगाणिस्तान

* स्थळ : हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंड, लीड्स  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

पाकिस्तान : सर्फराझ अहमद (कर्णधार व यष्टीरक्षक), इमाम-उल-हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हसनैन.

अफगाणिस्तान : गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : ३,  पाकिस्तान : ३,

अफगाणिस्तान : ०, टाय / रद्द :०/०

विश्वचषकात   

सामने :0, पाकिस्तान : 0,

अफगाणिस्तान : ०, टाय / रद्द :०/०

हॅरिस, बाबरवर फलंदाजीची मदार

धावांसाठी झगडणारा अनुभवी फलंदाज शोएब मलिकला वगळून हॅरिस सोहेलचा संघात करण्यात आलेला समावेश अनुकूल ठरला आहे. त्याने तीन सामन्यांत ५५च्या सरासरीने एकूण १६५ धावा केल्या आहेत. याचप्रमाणे बाबरने सहा सामन्यांत ६६.६०च्या सरासरीने एकूण ३३३ धावा केल्या आहेत. मोहम्मद हाफीजसुद्धा जबाबदारीने फलंदाजी करीत आहे.

अफगाणिस्तानला मने जिंकण्याची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तानने विश्वचषकामधील आतापर्यंतचे सातही सामने गमावले आहेत. त्यांचे आव्हान आधीच संपुष्टात आले असले तरी भारताला विजयासाठी झगडायला लावणाऱ्या त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्यांना विजय साकारता आला, तर विश्वचषकामधील धक्कादायक निकालामुळे ते मने जिंकू शकतील. रशीद खान आणि गुलबदीन नैब यांच्यासारख्या गुणी खेळाडूंना याची पूर्ण कल्पना आहे.

अव्वल फलंदाज

१. डेव्हिड वॉर्नर         ५००  धावा

२. आरोन फिंच         ४९६ धावा

३. शाकिब अल हसन    ४७६  धावा

अव्वल गोलंदाज

१. मिचेल स्टार्क       १९ बळी

२. जोफ्रा आर्चर        १६ बळी

३. मोहम्मद आमिर      १६ बळी