इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून हिरो म्हणून उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेंड्यांच्या प्रजातींसाठी ठोस भूमिका घेतल्याने पीटरसनने कौतुक केलं आहे. तसंच भारतात गेंड्यांची संख्या वाढवण्याचं श्रेय मोदींना दिलं आहे.

पीटरनने ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, “धन्यवाद, नरेंद्र मोदी. एक जागतिक नेता गेंड्यांच्या प्रजातीसाठी ठोस भूमिका घेत आहे. इतर नेत्यांनीही अशीच भूमिका घेतली पाहिजे. यामुळेच भारतात गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व्हॉट अ हिरो”.

आसाम सरकारने बेकायदेशीरपणे होणारी गेंड्यांची शिकार रोखण्यासाठी जागतिक गेंडा दिनी (World Rhino Day) गेंड्याच्या शिंगांची होळी करत शिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला. यासंबंधी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटला रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं होतं.

“आसाम टीमची प्रशंसनीय कामगिरी. एक शिंगाचा गेंडा भारताचा गौरव आहे आणि त्याच्या भल्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील,” असं नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या याच ट्वीटवर केविन पीटरसनने ट्वीट करत कौतुक केलं आहे.


आसाममध्ये २४७९ गेंड्यांची शिंगं का जाळली?

शिकार रोखण्यासाठी तसंच शिकाऱ्यांना गंभीर इशारा देण्यासाठी आसाम सरकारने नुकतंच गेंड्यांची २४७९ शिंगं जाळली. इतक्या मोठ्या प्रमाणात साठा नष्ट करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्बा शर्मा यांनी ट्वीट करत सांगितलं होतं की, “आसाम आणि भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आसाममध्ये बेकायदेशीर शिकार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन लक्षात घेता आम्ही एक शिंगाच्या गेंड्याचा २४७९ शिंगांचा साठा जाळण्याचा निर्णय घेतला आहे, जो जगातील अशा पद्दतीचा पहिलाच आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


पूर्ण विधी करत आणि राजकीय सन्मानाने शिंगं जाळण्यात आली. ही शिंगं जाळत शिकाऱ्यांना इशारा देण्यात आला. तसंच हा फक्त शरीराचा एक भाग असून यामध्ये औषधी गुणधर्म नाहीत असा संदेशदेखील आम्ही जगाला दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं होतं.