Crime News : एका महिलेचा लैंगिक छळ करुन तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला. मृत पीडिता दोन मुलांची आई होती. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
कुठे घडली घटना? पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा मृतदेह ती ज्या घरी राहते त्या घराच्या शेजारी असलेल्या घरातच आढळून आला. मध्य प्रदेशातील खांडवा या ठिकाणी ही घटना घडली आहे. शनिवारी दुपारी १ च्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या महिलेवर या दोघांनीच बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. हरी पालवी असं एका आरोपीचं नाव आहे. तर सुनील ध्रुवे असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. हरीच्या घरातच या महिलेचा मृतदेह आढळून आला.
महिलेचा मृतदेह कसा मिळाला?
ज्या पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली ती दोन मुलांची आई होती. आई घरात नाही म्हणून मुलगी तिचा शोध घेत होती आणि तिला हाका मारत होती. तिला हरीच्या घरात आई बेशुद्ध अवस्थेत आढळली. या प्रकरणी तातडीने तिने इतरांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांना यासंदर्भात कुणीतरी फोनवरुन माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले पण तोपर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर घटनेचे आणखी तपशील समजतील अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मध्य प्रदेशात जंगलराज, काँग्रेसची टीका
दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस नेते जितू पटवारी यांनी मध्य प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेशचं सरकार म्हणजे जंगलराज आहे अशी टीका पटवारी यांनी केली आहे. तसंच अशा प्रकारच्या घटना तेव्हाच घडतात जेव्हा राज्यात कायद्याचा धाक नसतो. या महिलेचा अशा पद्धतीने बलात्कार करुन ठार करणं ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि सरकारचं अपयश दाखवणारी आहे असंही पटवारी यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. आता या प्रकरणी आणखी काय तपशील समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.