एका महिलेवर चार जणांनी हॉटेलच्या छतावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या चार जणांमधला एक या महिलेचा मित्र आहे. त्याने या महिलेला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. मित्रावर विश्वास ठेवून ही महिला हॉटेलमध्ये गेली. तिथल्या छतावर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बंगळुरुतल्या कोरमंगला या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी घटना काय घडली?

बंगळुरुतल्या कोरमंगला भागात एका महिलेला चार आरोपींनी जुनी ओळख सांगितली. त्यातल्या एकाला ही महिला ओळखत होती. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. मित्राने हॉटेलमध्ये बोलवलं म्हणून ही महिला विश्वासाने गेली. मात्र यावेळी तिला छतावर नेऊन तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिच्याकडचे पैसेही या चौघांनी लुटले. तसंच नंतर या महिलेला तिथून हाकलून दिलं. बंगळुरुतल्या कोरमंगला भागात ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक

कोरमंगला येथील पोलिसांनी अजित, विश्वास आणि शिवू या तिघांना अटक केली आहे. उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून या तिघांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलीस उपायुक्त साराह फातिमा यांनी या घटनेबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “शुक्रवारी सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली. सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार जण सामील आहेत. त्यापैकी तिघांना आम्ही अटक केली आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहे. तसंच पीडितेची वैद्यकीय तपासणीही आम्ही केली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असं आम्हाला समजलं. या प्रकरणाचे तपशील आम्ही घेत आहोत. तसंच आरोपींची चौकशीही सुरु आहे. पीडित महिला दिल्लीची आहे. लग्नानंतर ती तिथे राहते.” असंही फातिमा यांननी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही महिला चांगल्या कुटुंबातील आहे. ती तिच्या मित्राला भेटायला गेली होती त्यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. दरम्यान जानेवारी महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. बंगळुरुतील होयसला भागात एका बांधकामाच्या ठिकाणी सहा वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करुन तिची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बंगळुरु हादरलं आहे.