Mehul Choksi Case : पंजाब नॅशनल बँकेच्या तब्बल १३ हजार कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात फरार मेहुल चोक्सी याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ‘मेहुल चोक्सीने भारतात केलेले गुन्हे बेल्जियममध्येही दंडनीय आहेत’, अशी टिप्पणी बेल्जियमच्या न्यायालयाने केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने असंही नमूद केलं की, ‘परदेशी नागरिक असलेल्या चोक्सीला १८७४ च्या बेल्जियम प्रत्यार्पण कायद्यानुसार प्रत्यार्पणाला सामोरं जावं लागेल.’ त्यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या आठवड्यात बेल्जियम येथील अँटवर्प न्यायालयाने मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाला मान्यता दिली आणि या वर्षाच्या सुरुवातीला बेल्जियम पोलिसांनी केलेली अटक वैध असल्याचाही निर्णय दिला. भारतीय अधिकाऱ्यांच्या औपचारिक विनंतीनंतर ११ एप्रिल रोजी अँटवर्प पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केलेली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

११ एप्रिल रोजी अँटवर्प पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केल्यापासून तो बेल्जियमच्या तुरुंगात आहे. त्यानंतर मेहुल चोक्सीने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्जही केला होता. मात्र, जामीन मिळाल्यास मेहुल चोक्सी पलायन करू शकतो, त्यामुळे पलायनाचा धोका असल्याच्या कारणावरून त्याला जामीन नाकारण्यात आला होता.

दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजीच्या आदेशात अपील न्यायालयाने नमूद केलं की, “भारतीय अधिकाऱ्यांनी सूचीबद्ध केलेले गुन्हे, ज्यात गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचार यांचा समावेश आहे. ते गुन्हे भारतीय आणि बेल्जियम कायद्यानुसार एक वर्षापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेस पात्र आहेत.”

मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत?

१) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत.

२) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

३) नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना एलओयू (लेटर ऑफ अंडरटेकिंग), फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.