अलीकडेच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल आमदार शोभाराणी कुशवाह यांची भारतीय जनता पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्या राजस्थानातील ढोलपूर मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर पक्षानं त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. भाजपाचे केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी आमदार शोभाराणी कुशवाह यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.

संबंधित पत्रात शोभाराणी कुशवाह यांना उद्देशून म्हटलं आहे की, “तुम्हाला पक्षातून तत्काळ निष्कासित करण्यात येत आहे. तसेच पक्षाने दिलेल्या इतर जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात येत आहे. शोभाराणी कुशवाह यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यात येणार असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पक्षाने १० जून रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १९ जूनपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. असं असताना कुशवाह यांनी केंद्रीय शिस्तपालन समितीकडे स्पष्टीकरण सादर करण्याऐवजी, ११ जून रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करत पक्ष नेतृत्वावर सार्वजनिकरित्या आरोप केले. त्यामुळे पक्षातून त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.

कुशवाह यांना राज्यसभा निवडणुकीत भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुभाष चंद्र यांना मत देण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांना क्रॉस व्होटिंग केलं. याचा तोटा सुभाष चंद्र यांना झाला आणि त्यांना राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी राज्यसभेवर निवडून गेले. यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेते घनश्याम तिवारी राजस्थानतून वरिष्ठ सभागृहात निवडून आले.