CRPF Jawan Arrested : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी हरियाणामधून सहा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा देखील समावेश होता. या प्रकरणानंतर संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती.ज्योती मल्होत्रा प्रकरणात आता अनेक खुलासे समोर येत आहेत. यानंतर आता पाकिस्तानला गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी एका सीआरपीएफ जवानाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे.

या घटनेबाबत राष्ट्रीय तपास संस्थेने सोमवारी सांगितलं की, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली सीआरपीएफ जवानाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती या जवानाने पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

या सीआरपीएफ जवानांना दिल्लीमधून अटक करण्यात आली असून त्याची पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास एजन्सीने म्हटलं आहे की त्या जवानाला त्यांच्याकडून निधी मिळाल्यानंतर तो गोपनीय माहिती शेअर करत होता. तसेच या जवानाला सेवेतून देखील काढून टाकण्यात आलं होतं. या जवानाला पटियाला हाऊस न्यायालयाच्या विशेष न्यायालयात दाखल केलं असता या जवानाला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

एनआयएच्या प्रवक्त्याने या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, “आम्ही सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. त्याचं नाव मोती राम जाट असं आहे. तो हेरगिरीच्या प्रकरणात सक्रियपणे सहभागी होता आणि २०२३ पासून तो पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होता. आम्हाला असंही आढळून आलं आहे की तो विविध मार्गांनी पीआयओंकडून निधी मिळवत होता.”

दरम्यान, सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधून मोती राम जाटच्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवत असताना त्याने स्थापित नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. आता पुढील चौकशीसाठी त्याला एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. त्याचबरोबर सीआरपीएफ नियमांच्या भारतीय संविधानाच्या संबंधित तरतुदींनुसार २१ मे पासून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे”, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.