अनेक कुप्रसिद्ध गुंड, गँगस्टर्स किंवा दहशतवाद्यांच्या अटकेच्या थरारक कहाण्या आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. यात अनेक दरोडेखोरांचाही समावेश आहे. यांच्या अटकेसाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. पण पंजाब पोलिसांनी एका अट्टल दरोडेखोर जोडप्याला एका १० रुपयांच्या फ्रूटीच्या सापळ्यात अडकवलं आणि ते दोघेही अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले! या कारवाईबद्दल पंजाब पोलिसांचं कौतुक होत असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. लुधियानामध्ये झालेल्या एका मोठ्या दरोड्याप्रकरणी हे दोघे वाँटेड होते. त्यापैकी पुरुषाचं नाव जसविंदर सिंग असून महिलेचं नाव मनदीप कौर आहे. मनदीपला चक्क ‘डाकू हसीना’ म्हणूनही ओळखलं जातं!

नेमकं काय घडलं?

जसविंदर सिंग आणि मनदीप कौर हे दोघे लुधियानातील एका दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी आहेत. १० जून रोजी लुधियानातील कॅश मॅनेजमेंट कंपनी सीएमएस सेक्युरिटीजमध्ये या दोघांनी दरोडा टाकला. कार्यालयातल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दरडावून या दोघांनी कार्यालयात असणारी तब्बल ८ कोटींची रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दिवसाढवळ्या अशा प्रकारे दरोडा पडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी तातडीने पावलं उचलत या दोघांचा शोध सुरू केला.

पोलिसांना सुगावा लागला..

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना हे दोघे उत्तराखंडमधील हेमकुंत साहिब या प्रार्थनास्थळाला भेट देणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्यानुसार या ठिकाणी आधीच सापळा रचला. हे दोघे आपला चेहरा उघड करून येणार नाहीत, याची पोलिसांना खात्री होती. त्यामुळे पोलिसांनी एक वेगळीच शक्कल लढवली!

काही पोलीस साध्या वेशात हेमकुंत साहिबजवळ पायऱ्यांवर फ्रूटी देण्यासाठी उभे राहिले. यात्रेकरू आणि भक्तमंडळींना मोफत फ्रूटी वाटायला त्यांनी सुरुवात केली. पोलिसांच्या अपेक्षेप्रमाणे हे दोघेही तिथे आले. पोलिसांनी दिलेली फ्रूटी त्यांनी घेतली. ‘डाकू हसीना’ उर्फ मनदीप कौर आणि जसविंदर सिंग या दोघांनी फ्रूटी पिण्यासाठी चेहऱ्यावरचं कापड बाजूला केलं आणि पोलिसांना लागलीच त्यांची ओळख पटली. लगेच हालचाल करत पोलिसांनी या दोघांना अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी दरोड्याबद्दल इश्वराचे आभार मानायचे होते!

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. दरोडा यशस्वी झाल्याबद्दल हे दोघे प्रार्थना करण्यासाठी या प्रार्थनास्थळी पोहोचल्याचं समोर आलं आहे. शिवाय, त्यांच्याकडून दरोड्यात लंपास केलेल्या रकमेपैकी २१ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. शिवाय, आत्तापर्यंत त्यांची साथ देणाऱ्या इतर काही साथीदारांचीही पोलिसांनी धरपकड केली असून त्यातून आत्तापर्यंत ५ कोटी ९६ लाखांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. डाकू हसीना आणि तिचा पतीच या दरोड्याचा सूत्रधार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.