काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब येथील सिमावर्ती भागांत भारतीय सैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना केल्यानंतर, आता थेट सियाचीनमध्ये भारतीय सिमेवर सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे. भारतीय लष्करातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची दोन फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली.

सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक तेथे देशाच्या सीमेचे रक्षण करीत असतात. आता थेट तेथेच गणपती मूर्तीची स्थापना झाल्यामुळे सैनिकांना यामधून प्रेरणा मिळणार आहे. ‘दगडूशेठ गणपती’च्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती एकता व अखंडतेचे प्रतिक असलेल्या भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये स्थापन करण्याची इच्छा बटालियनतर्फे व्यक्त केली आणि ट्रस्टने त्यांच्या इच्छेला मान देऊन ‘श्रीं’ची हुबेहुब दोन फूटांची उंची प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले.

ही मूर्ती पुण्यातील मूर्तीकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली असून नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना श्रींचं दर्शन घेता येत नाही. त्यामुळे २२ मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा बटालियनच्यावतीने व्यक्त केली. ही मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र १९ मार्च २०२२ रोजी पाठविले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी देखील काश्मीर येथील गुरेज सेक्टर येथे ६ मराठा बटालियनने तसेच त्यानंतर १ व ६ मराठा बटालियनने अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. सिमेवर गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना प्रेरणा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी सर्वांची आमची भावना असल्याचे सैनिकांनी यावेळी सांगितले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, मूर्तिकार भालचंद्र देशमुख, सिद्धार्थ गोडसे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.