‘पद्मावती’ चित्रपटावरुन निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसतो आहे. राजस्थानमधील नाहरगढ किल्ल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. किल्ल्याच्या बुरुजावर लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निषेधार्थ हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी असणाऱ्या दगडांवर पद्मावतीचा निषेध करणारा मजकूरदेखील आढळून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानातील जयपूरमध्ये असणाऱ्या नाहरगढ किल्ल्यावर आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. याच भागातील दगडांवर पद्मावतीचा विरोध करणारा मजकूरदेखील आढळून आला. ‘आम्ही पुतळे जाळत नाही, लटकवतो,’ असा मजकूर दगडांवर लिहिण्यात आला आहे. फासावर लटकवण्यात आलेली व्यक्ती चाळीस वर्षांची असून तिचे नाव चेतन आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती उत्तर जयपूरचे उपायुक्त सत्येंद्र सिंग यांनी दिली.

नाहरगढ किल्ल्यावरील ही घटना खून आहे की आत्महत्या, याबद्दल पोलिसांनी बोलण्यास नकार दिला. ‘नायलॉन वायरच्या मदतीने चेतनचा मृतदेह लटकवण्यात आला होता. त्याच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरुन त्याची ओळख पटली,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेशी करणी सेनेचा संबंध नसल्याचे सेनेचे सदस्य महिपाल सिंग मकराना यांनी सांगितले. ‘हा आमचा विरोधाचा मार्ग नाही. लोकांनी चित्रपटाचा निषेध करण्यासाठी अशा मार्गाचा वापर करु नये,’ असे आवाहनही त्यांनी केले.

याआधी करणी सेनेने पद्मावती चित्रपटाचा निषेध म्हणून दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करण्याची धमकीदेखील देण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ चित्रपट सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिल्जी यांचे प्रेमप्रसंग दाखवण्यात आल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड करुन त्या चित्रपटात दाखवून राजपूत समाजाचा अपमान करण्यात आल्याचा आक्षेपदेखील करणी सेनेने घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead body with anti padmavati slogans found hanging at rajasthans nahargarh fort
First published on: 24-11-2017 at 13:56 IST