चिनी अॅप ‘डीपसीक’चा वाढता पसारा हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील अमेरिकी कंपन्यांसाठी एक इशारा आहे,’ असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्तेची स्पर्धा जिंकण्यासाठी अमेरिकी कंपन्यांना अगदी बारकाईने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे ट्रम्प म्हणाले. चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनीची निर्मिती करणाऱ्या ‘ओपनएआय’पेक्षा आपले प्रारूप किफायतशीर आहे असे ‘डीपसीक’ने म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले की, ‘गेले काही दिवस मी चीन आणि चीनच्या कंपन्यांबद्दल वाचत आहे. यातील एक कंपनी ‘एआय’ अधिक गतीने आणि कमी किमतीत तयार करीत आहे. हे चांगले आहे. कारण तुम्हाला त्यासाठी खूप कमी पैसे मोजावे लागतात. ही बाब सकारात्मक आहे, असे मी मानतो. तुम्हीही तेच काम करीत आहात. तुम्हालाही अंतिमत: तेच मिळणार आहे,’ या शब्दांत त्यांनी अमेरिकी कंपन्यांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे.

एका चिनी कंपनीने ‘डीपसीक’ एआय सुरू करणे हा आपल्या उद्याोगांसाठी एक धोक्याचा इशारा आहे असे मला वाटते. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ आहेत, मला भेटलेल्या चिनी नेत्यांचेही असेच म्हणणे आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या कंपन्यांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे असे ट्रम्प म्हणाले. त्यांच्याकडे ‘डीपसीक’ असेल तर आपल्याकडे कल्पना आहे असा दिलासाही त्यांनी दिला. दरम्यान, सोमवारी सायबर हल्ला झाल्यामुळे वापरकर्त्यांना संकेतस्थळावर नोंदणी करण्यात अडचणी आल्याचे ‘डीपसीक’कडून सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात एआय कंपन्यांची पडझड

‘डीपसीक’ बाजारपेठेत आल्याचा मोठा फटका निविडिया, ओरॅकल, ब्रॉडकॅम यासारख्या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांना बसला आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात त्यांच्या समभागांचे मूल्य घसरले. आघाडीची एआय कंपनी असलेल्या निविडियाचे बाजारमूल्य ५९३ अब्ज डॉलर इतके कमी झाले. कोणत्याही कंपनीसाठी एका दिवसात झालेली ही विक्रमी घसरण आहे. त्याशिवाय एआयशी संलग्न असलेल्या सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमधील कंपन्यांचे एकत्रित नुकसान एक ट्रिलियन डॉलर इतके होते.

डाऊनलोड करण्याकडे ओढा

‘डीपसीक’ एआयने जगभरात उत्सुकता निर्माण केली. मंगळवारी दुपारी अॅपलच्या अॅपस्टोअरवरून डाऊनलोड करण्यात आलेले ‘डीपसीक’ हे पहिल्या क्रमांकाचेे अॅप होते. विशेषत: ओपनएआयच्या चॅटजीपीटीच्या तुलनेत कमी किंमतीला उपलब्ध असलेले हे अॅप कसे काम करते याबद्दल उत्सुकता होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनसंबंधी प्रश्नांवर ‘डीपसीक’ची भिन्न उत्तरे

‘डीपसीक’चा एआय उद्याोगावर अंतिम परिणाम काय होईल हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, चीनसंबंधी संवेदनशील प्रश्नांवर ‘डीपसीक’ची उत्तरे चॅटजीपीटीपेक्षा भिन्न असल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यावर उपहासात्मक टीका करण्यासाठी विनी द पूह हा शब्दप्रयोग चीनमध्ये वापरला जातो. चीनमध्ये विनी द पूहचा अर्थ काय, या प्रश्नाचे चॅटजीपीटीने अचूक उत्तर दिले. तर ‘डीपसीक’ने ते एक कार्टून पात्र आहे असे सर्वज्ञात उत्तर दिले. चीन सरकारने २०२३मध्ये लागू केलेल्या नियमनांनुसार, चिनी कंपन्यांना उत्पादने बाजारपेठेत आणण्यापूर्वी सुरक्षा पुनरावलोकन करावे लागते आणि मंजुरी घ्यावी लागते.