पठाणकोट हल्ल्याप्रकरणी भारताने दिलेले पुरावे अमान्य केल्याबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तान झोपेचे सोंग घेत असून हल्ल्याच्या चौकशीबाबत गंभीर नाही, असे पर्रिकर यांनी म्हटले आहे.
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाला जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असेही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सदर प्रश्न पंतप्रधानांचे कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संबंधित आहे, असे पर्रिकर यांनी ‘टू द पॉइण्ट’ या एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. एखाद्याने झोपेचे सोंग घेण्याचेच ठरविले असेल तर त्याला जागे करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. भारताने दिलेले पुरावे पुरेसे नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानला दिलेले भ्रमणध्वनी क्रमांकही बनावट आहेत, या पाकिस्तानच्या दाव्यावर पर्रिकर उसळून म्हणाले की, बनावट आणि नोंदणी न केलेले क्रमांक देण्यामागे कोणाचा हात आहे ते शोधण्याची त्यांची जबाबदारी आहे. पाकिस्तानला जी माहिती हवी असेल ती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय तपास यंत्रणा पुरवील, असेही ते म्हणाले.



