नवी दिल्ली : साडेबारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. त्यांनी सर्व समाजाला सहभागी करून घेत विकास साधला व धर्मनिरपेक्ष सत्तेला नवे परिमाण दिले. मग, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ची जोड देत  लोकशाही व्यवस्था मजबूत केली, असे मोदींच्या दोन दशकांच्या शासनकाळाचे विश्लेषण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिलिव्हरिंग डेमोक्रसी’ या रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या चर्चासत्राची सांगता शुक्रवारी झाली. त्या वेळी ते बोलत होते.

महात्मा गांधीजींनंतर लोकांच्या मनावर पकड साधणारा मोदींशिवाय दुसरा लोकनेता नाही. गांधीजी आध्यात्मिक होते, तसे मोदीही आध्यात्मिक आहेत. त्यांची लोकांची सेवा करण्याची सातत्याने धडपड सुरू असते. अध्यात्म म्हणजे मनाचे मोठेपण. ज्या व्यक्तीचे मन मोठे असते तोच पंतप्रधान हातात झाडू घेऊन स्वच्छता करू शकतो, कोणाचे पाय धुवू शकतो. मोदींसाठी राजकारण ही दुय्यम बाब असते. मोदी म्हणजे २४ कॅरेटचे सोने आहे. त्यांच्या हेतू आणि प्रामाणिकपणाबद्दल कोणी शंका घेऊ  शकत नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, असे मोदींच्या नेतृत्वाचे राजनाथ यांनी कौतुक केले.

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा भाजपच्या प्रत्येक जाहीरनाम्यात समाविष्ट केला जात असे. २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यावर मोदींनी चुटकीसरशी ३७० रद्द केले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे मनोधैर्य मोडून पडले. सर्जिकल स्ट्राइक करून सीमापार धडा शिकवला, असे राजनाथ म्हणाले.

लोकशाही विकसित करण्याच्या मोदींच्या प्रयत्नांची माहिती लोकांना झाली पाहिजे, या उद्देशाने अशी आणखी किमान दहा चर्चासत्रे घेतली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. या चर्चासत्रात १६६ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

उद्योजकांचा सन्मान!

कोणत्याही आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर करण्याची कला मोदींइतकी अन्य कोणालाही जमली नाही. त्यांनी वैयक्तिक हक्क आणि राष्ट्रहित यांच्यात समन्वय साधला. मोदी कधीही उद्योग आणि उद्योजक यांच्यापासून लांब राहिले नाहीत. गरिबांचे कल्याण साधताना उद्योगांपासून दूर राहण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही. उद्योजकांचा सन्मान केला, त्यांना प्रोत्साहन दिले, देशाच्या विकासात त्यांना सहभागी करून घेतले, असा युक्तिवाद राजनाथ यांनी केला. मोदींकडे निर्णयक्षमता आणि धोका पत्करण्याची तयारी आहे. प्रभावशाली नेतृत्व म्हणजे काय हे मोदींकडून शिकावे. व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात ‘मोदींचे शासन’ असा धडा समाविष्ट केला पाहिजे, असेही राजनाथ म्हणाले. भाजपच्या राजकीय विचारसरणीचा प्रसार आणि प्रचारासाठी मोदींनी केलेले प्रयत्न (डिलिव्हरिंग आयडिओलॉजी) यावर चर्चासत्र घेण्याची सूचना राजनाथ सिंह यांनी केली.

वाजपेयींशी तुलना

नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळाची तुलना राजनाथ यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीशी केली. वाजपेयींनीही चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. गावा-गावांत रस्ते बांधले, आजही लोक वाजपेयींची आठवण काढतात. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींनीही नगर-विकासाला नवे रूप दिले. वाजपेयींनी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. त्या काळात मोदी मुख्यमंत्री म्हणून गुजरातला चोवीस तास वीजपुरवठय़ाचा संकल्प पूर्ण करत होते, तेव्हा मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होतो, पण मलाही राज्यात अखंड वीजपुरवठा करता आला नाही, अशी कबुली राजनाथ यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defense minister rajnath singh praises narendra modi zws
First published on: 30-10-2021 at 02:11 IST