Delhi BMW Accident Accused Gaganpreet Kaur bail Application in Court : दिल्लीमधील कॅन्टॉन्मेंट भागात रविवारी (१४ सप्टेंबर) दुपारी भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या नवजोत सिंग (५७) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कार चालवणारी महिला गगनप्रीत कौर हिला अटक केली आहे. गगनप्रीविरोधात मनुष्यवधासंबंधी (हत्या न ठरणारा) कलमांतर्गत आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, गगनप्रीत कौरने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी तिच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
देशात दरवर्षी ५,००० अपघात होतात : आरोपी गगनप्रीत कौर
“बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत नवजोत सिग यांचा मृत्यू होणं दुर्दैवी आहे. परंतु, आपल्या देशात दर वर्षी पाच हजार अपघात होतात ही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही”, असा युक्तिवाद गगनप्रीतच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. गगनप्रीतने नवजोत सिंग यांच्या दुचाकीला दिलेल्या धडकेने नवजोत यांचा बळी गेला. तसेच त्यांच्या पत्नी या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या वेंकटेश्वर रुग्णालयात उपचार चालू आहेत. एनडीटीव्हीने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वाहतूक व्यवस्थेवर बोट ठेवून गगनप्रीतचा कांगावा
अपघातात गगनप्रीतलाही छोटी दुखापत झाली होती. त्यामुळे अपघातानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी गगनप्रीतला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला ज्यावर काही वेळापूर्वी सुनावणी झाली. दरम्यान, जामीनासाठी तिच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात गगनप्रीतने गुन्हा कबूल केला नाही. उलट भारतातीस वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायालयात काय घडलं?
गगनप्रीतचे वकील न्यायालयात म्हणाले, “या अपघातासाठी केवळ माझ्या आशिलास (गगनप्रीत कौर) जबाबदार ठरवता येणार नाही. अपघात झाला तेव्हा बाजूने जाणारी डीटीसीची बस व रुग्णवाहिकेला देखील आरोपी ठरवलं पाहिजे. कारण नवजोत यांची दुचाकी डीटीसी बसला देखील धडकली होती.” दरम्यान, दिल्ली न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी शनिवारपर्यंत स्थगित केली आहे. न्यायालयाने बीएमडब्ल्यू कार अपघाताशी संबंधित सीसीटीव्ही फूटेज संरक्षित करण्याची नोटीस जारी केली आहे, जेणेकरून याप्रकरणाच्या भविष्यातील तपासात कोणताही अडथळा येऊ नये आणि वाद निर्माण होऊ नये.