आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महागाईवरून भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे. सरकार पाडण्यासाठी ६ हजार ३०० कोटी खर्च केले नसते तर देशातील महागाई नियंत्रणात आली असती, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दही, ताकासह जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीवरूनही केजरीवाल यांनी भाजपा सरकारला धारेवर धरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण व्यवस्थेवरुन सिसोदियांनी भाजपाला सुनावले; म्हणाले, “भाजपा हा अशिक्षितांचा पक्ष आणि…”

“गहू, तांदुळ, दही, ताक, मधावर लादण्यात आलेल्या जीएसटीतून सरकारला वर्षाकाठी ७ हजार ५०० कोटींचा महसूल मिळणार आहे. तर आत्तापर्यंत सरकार पाडण्यासाठी सरकारने ६ हजार ३०० कोटींचा खर्च केला आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला नसता तर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादण्याची वेळ आली नसती. जनतेला महागाईचा सामना करावा लागला नसता”, असा संताप ट्वीट करत केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावरील सीबीआय छापेमारीवरुनही केजरीवाल यांनी भाजपा सरकारला खडेबोल सुनावले आहेत. “सीबीआयने १४ तास सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी केली. यादरम्यान त्यांना दागिने, रोख रक्कम किंवा संपत्तीचे कुठलेही दस्तावेज आढळून आले नाहीत. सीबीआयने खोट्या माहितीच्या आधारे ही छापेमारी केली होती”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात खोटे खटले रचले जात असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. “दिल्लीतील ‘आप’चे सरकार लोकप्रिय आहे. या सरकारविरोधात देशविरोधी शक्ती एकत्रित आल्या आहेत. या शक्तींना आम्हाला तोडायचे आहे. मात्र, आमचे सर्व आमदार एकसाथ आहेत. गुजरात निवडणुकीपर्यंत आमच्यावर खोटे खटले दाखल होत राहणार आहेत”, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi chief minister arvind kejriwal attacked bjp on inflation and gst rvs
First published on: 27-08-2022 at 18:45 IST