scorecardresearch

दिल्लीतील अग्नितांडव : घटनेची न्यायालयीन चौकशी; मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिले आदेश

दिल्लीतील अग्नितांडव : घटनेची न्यायालयीन चौकशी; मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

राजधानी दिल्ली सकाळी लागलेल्या आगीच्या घटनेनं हादरली. धान्य बाजार परिसरात झालेल्या अग्नितांडवात तब्बल ४३ निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला. तर अनेक जण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं होरपळे आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, “या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपयांची मदत देणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्लीतील धान्य बाजार परिसरात रविवारी (८ डिसेंबर) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास आगीचा भडका उडाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीनं काही क्षणातच रौद्रवतार धारण केला. यात तब्बल ४३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना सफदरजंग आणि एलएनजेपी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर केजरीवाल यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, “ही घटना वेदनादायी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची नुकसान भरपाई देण्यात येईल, तर जखमींना एक लाख रूपये भरपाई देण्यात येईल. त्याचबरोबर जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार देईल,” अशी माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.

बिहार, उत्तर प्रदेशातील कामगार-

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, फॅक्ट्रीमध्ये सकाळी कामगार गाढ झोपले असताना अचानक आगीचा तांडव झाला. अनेकांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घेटनेत मृत्यू झालेले कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. या भीषण आगीमधून अनेकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळावर होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यानं सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2019 at 12:38 IST

संबंधित बातम्या