scorecardresearch

घुसखोर चीनकडून आयातीस केंद्र सरकारची परवानगी का? अरविंद  केजरीवाल यांचा सवाल

‘‘गेल्या काही वर्षांपासून चीन घुसखोरी करत असून देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही वेदनादायक बाब आहे.

घुसखोर चीनकडून आयातीस केंद्र सरकारची परवानगी का? अरविंद  केजरीवाल यांचा सवाल

नवी दिल्ली :अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैन्य समोरासमोर आले असल्याने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला फटकारले. भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनकडून आयातीस केंद्र सरकार परवानगी का देते, असा सवाल विचारत भारतीय सैन्यांबद्दल धैर्य व आदर दाखविण्यास केजरीवाल यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना केजरीवाल बोलत होते. सीमेवर चीनची आक्रमकता वाढत असताना, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार ‘सर्व काही ठीक आहे,’ असे म्हणते. चीनला ‘शिक्षा’ देण्याऐवजी, मोदी सरकार चीनला देशातून मोठय़ा प्रमाणात आयात करण्यास परवानगी देत आहे. अनेक भारतीय सैनिक चिनी सैन्याशी लढताना आपले प्राण पणाला लावत आहेत, याची जाणीव असू द्यावी, असे केजरीवाल म्हणाले.

‘‘गेल्या काही वर्षांपासून चीन घुसखोरी करत असून देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही वेदनादायक बाब आहे. आपल्या देशाचे सैनिक त्यांच्याशी खंबीरपणे लढतात आणि आपल्या प्राणांची आहुती देतात. गेल्या काही वर्षांपासून चीन आमच्या हद्दीत घुसल्याबद्दल आम्ही ऐकत आहोत,’’ असे केजरीवाल म्हणाले.

२०२०-२१ मध्ये भारताने ६५ अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंची आयात केली. चीनची भारतावर वाकडी नजर असतानाही भाजप सरकारने पुढील वर्षी चिनी वस्तूंची आयात आणखी ९५ अब्ज डॉलपर्यंत वाढू दिली, असा दावा केजरीवाल यांनी केला. ‘‘तुम्हाला आपल्या सैनिकांबद्दल आदर नाही का? त्यांच्या जिवाची किंमत नाही का?.. जरा िहमत दाखवा. भारताने आयात बंद केली तर चीनला त्याची किंमत कळेल,’’ असेही ते म्हणाले.

केजरीवाल यांनी देशाला चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. ‘‘चिनी उत्पादने स्वस्त असली तरी आम्हाला नको आहेत. आमच्यासाठी दुप्पट किंमत मोजावी लागली तरी आम्ही भारतात बनवलेली उत्पादने खरेदी करायला तयार आहोत,’’ असे ते म्हणाले.  वाढती महागाई, बेरोजगारीतून जनतेला दिलासा देण्याचा केंद्राचा कोणताही हेतू नसल्याचा आरोप त्यांनी केला. चीनमधून आयात होणाऱ्या ९० टक्के वस्तू भारतात तयार केल्या जाऊ शकतात, असा दावा केजरीवाल यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 03:05 IST

संबंधित बातम्या