दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दिल्लीतल्या मुख्यमंत्री निवासस्थानाची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. त्यावरुन विरोधकांनी केजरीवाल सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विचारलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, सीबीआय मार्फत अशा प्रकारे चौकशी होणं हे पंतप्रधान मोदींची भीती दर्शवणारं आहे असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत अरविंद केजरीवाल?
पहिल्यांदा कुठल्या तरी गोष्टीवरुन चौकशी केली जाते आहे असं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत, अशा प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाची चौकशी करणं हे त्यांची भीती दाखवणारं आहे. आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त वेळा आमची चौकशी करण्यात आली आहे. कधी सांगतात मद्य घोटाळा झाला. कधी सांगतात केजरीवाल यांनी बस घोटाळा झाला, कधी सांगतात शाळा प्रवेशात घोटाळा आहे, माझ्यावर आत्तापर्यंत ३३ पेक्षा जास्त केसेस करण्यात आल्या आहेत. त्यांना (मोदींना) वाटतं मी त्यांच्यासमोर गुडघे टेकेन. मात्र तसं कधीच होणार नाही. मी झुकणार नाही. ३३ प्रकरणात माझी चौकशी झाली, चौकश्यांमधून यांच्या हाती काही लागलं नाही.
चौथी पास राजाला माझं खुलं आव्हान
आता त्यांनी (मोदी) नवी चौकशी सुरु केली आहे. चौकशीचं स्वागत करतो. या चौकशीतूनही काहीच निष्पन्न होणार नाही. आधीही काही मिळालं नाही आत्ताही काही मिळणार नाही. चौथी पास राजाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवणार? २४ तास हे फक्त चौकशीचा खेळ खेळतात किंवा भाषणं करतात. यांना इतर काही कामं नाहीत. आता माझं चौथी पास राजाला एक आव्हान आहे जर मागच्या वेळप्रमाणे यावेळीही काहीही निष्पन्न झालं नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं आव्हान दिलं आहे.
दिल्लीचे मुख्मयंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख चौथी पास राजा असा केला. आता यावर भाजपा आक्रमकपणे त्यांना उत्तर देण्याची शक्यता आहे. नेमकं पुढे काय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.