महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीतील राऊज रेवेन्यू न्यायालयाने हे आरोप निश्चित केले असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात खटना चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

२०२३ मध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणी हस्तक्षेप करत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा – तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी १५ जून २०२३ रोजी कलम ३५४, कलम ३५४-अ आणि कलम ५०६ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, जुलै महिन्यात सत्र न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, आज दिल्लीतील राऊज रेवेन्यू न्यायालयाने कथित लैंगिक शोषणप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम ३५४, ३५४-अ आणि कलम ५०६ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. याप्रकरणी खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. याशिवाय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्यावर कलम ५०६(१) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.