Delhi Crime : राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाच जणांचे मृतदेह दिल्लीतल्या रंगपुरी या ठिकाणी असलेल्या घरात आढळले आहेत. ANI च्या वृत्तानुसार एका माणसाने त्याच्या चार मुलींसह विष मिसळलेला पदार्थ खाऊन आयुष्य संपवलं आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पोलिसांना नेमकं काय आढळलं?

रंगपुरी या भागात असलेल्या एका घरात पोलिसांना पाच मृतदेह आढळले आहेत. चार मृतदेह मुलींचे आहेत, एक मृतदेह माणसाचा आहे. चारही मुलींना विष देऊन या माणसाने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या माणसाला ज्या चार मुली होत्या त्यातल्या मोठ्या मुलीला एका डोळ्याने दिसत नव्हतं. तर एका मुलीला चालण्याचा त्रास होता. या ठिकाणी सल्फाज चे पाऊच मिळाले आहेत. तेच मिसळून बहुदा या सगळ्यांचा मृत्यू झाला असावा हा पोलिसांचा अंदाज आहे.

चार मृतदेह एका खोलीत, पाचवा मृतदेह दुसऱ्या खोलीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींचे मृतदेह हे पहिल्या खोलीत असलेल्या डबलबेडवर पडले होते. चारही मृतदेहांच्या तोंडातून फेस आला होता. तर या मुलींच्या वडिलांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळला आहे. सगळ्या मुलींच्या पोटावर आणि गळ्यावर लाल धागा बांधण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पोलिसांना ही घटना कळली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.

हीरा लाल असं आत्महत्या केलेल्या माणसाचं नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या माणसाने मुलींसह आत्महत्या केली तो माणूस सुतारकाम करत होता. वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीचं म्हणजेच या मुलींच्या आईचं कर्करोगाने निधन झालं. जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे त्यात २४ सप्टेंबरला हे सगळे सदस्य घराच्या आत बाहेर जाताना दिसत आहेत. २५ सप्टेंबरपासून या घराचा दरवाजा बंद होता. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले तेव्हा त्यांना वडिलांसह चार मुलींचे मृतदेह आढळून आले. या माणसाचं नाव हीरा लाल असं होतं असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी सकाळी १० वाजता या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पाच मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच कचरा पेटीत पोलिसांना ज्यूसचे टेट्रा पॅक आणि सल्फाजचे पाऊच मिळाले आहेत. या पाच जणांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? सगळ्यांनी एकदमच आत्महत्या केली की वडिलांनी मुलींना विष देऊन मारलं आणि मग आत्महत्या केली? हे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि आम्ही त्या अनुषंगाने तपास करत आहोत.