दिल्लीतील कारवाईबाबत रेल्वेमंत्री प्रभू यांचे लोकसभेत स्पष्टीकरण; राहुल यांच्या टीकेला केजरीवाल यांचे प्रत्युत्तर

दिल्लीतील शकुरबस्ती येथे रेल्वेमार्गावर धोकादायक ठरणारी अतिक्रमणे नियमानुसार हटवण्यात आली असून त्याचा तेथे मरण पावलेल्या लहान मुलाशी काही संबंध नाही. मुलाचा मृत्यू अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यापूर्वी दोन तास आधी झाल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी लोकसभेत जाहीर केले.
राजधानीतील शकुरबस्ती येथील रेल्वे स्थानकाजवळची अतिक्रमणे हटवताना एका मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा करत आम आदमी पक्षाने (आप) केंद्रातील सरकारला धारेवर धरले आहे. आपचे भगवंत मान यांनी हा मुद्दा उचलून धरला. अतिक्रमण हटवण्यापूर्वी तेथील रहिवाशांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन पत्रे लिहिली आहेत. तरीही ही मोहीम हाती घेण्यात आली, असा आरोप मान यांनी केला.
त्यावर प्रभू यांनी स्पष्ट केले की, हटवलेली अतिक्रमणे रेल्वेमार्गावर सुरक्षेला बाधा पोहोचवत होती. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या जिवालाही धोका होता. अशा अवैध वस्त्यांमुळेच घाण व अस्वच्छता पसरते. या मुद्दय़ावरून राष्ट्रीय हरित लवादानेही नुकतेच रेल्वे प्रशासनाला सुनावले होते. रहिवाशांना वेळोवेळी जागा मोकळी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही मोहीम राबवण्यात आली. ती सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी त्या मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद दिल्ली पोलिसांकडे आहे. त्यामुळे मोहिमेचा त्या मुलाच्या मृत्यूशी काही संबंध नाही, असे प्रभू यांनी सांगितले.

राहुल गांधी ‘बच्चा’ – केजरीवाल
दिल्लीतील एक झोपडपट्टी हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ निदर्शने केल्याबद्दल करण्याच्या आम आदमी पक्षावर प्रश्नचिन्ह लावणारे काँग्रेसचे राहुल गांधी यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘बच्चा’ अशा शब्दांत खिल्ली उडवली.‘‘राहुल गांधी हा ‘बच्चा’ आहे. भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते हे बहुधा त्यांच्या काँग्रेस पक्षाने त्यांना सांगितले नसावे,’’ असे केजरीवाल म्हणाले. ‘आम आदमी पक्ष धरणे का देत आहे? ते स्वत:च तर दिल्लीत सत्तेवर आहेत,’ असे यापूर्वी राहुल यांनी त्या पक्षाच्या निदर्शनांवर टीका करताना म्हटले होते. रेल्वे मंत्रालयाने शनिवारी दिल्लीतील एक झोपडपट्टी हटवल्याच्या निषेधार्थ ‘आप’चे कार्यकर्ते हे आंदोलन करीत असून त्यात तृणमूल काँग्रेसचे खासदारही सहभागी झाले होते.
अशा रीतीने झोपडय़ा पाडण्यापूर्वी पुनर्वसनाची कुठलीही योजना नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितले असता त्यांनी रेल्वेचा हा दावा खोडून काढला, अशी माहिती दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिली.
झोपडपट्टीधारक १९९२-९४ सालापासून तेथे राहत होते, परंतु त्यांची घरे मंत्रालयाने एका क्षणात पाडली, असे बेघर झालेल्या लोकांना भेटल्यानंतर केजरीवाल म्हणाले.

रेल्वे प्रशासनाने दिल्लीतील शकुरबस्ती येथे ऐन हिवाळ्यात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवायला नको होती. दिल्लीत शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार असताना २००७ साली शकुरबस्ती येथे रेल्वे स्थानक उभारण्याची योजना आखण्यात आली होती. तेव्हापासून त्याबाबत प्रयत्न सुरू होते. या प्रश्नावर राजकारण न करता मानवतेच्या भावनेतून पाहिले पाहिजे.
– व्यंकय्या नायडू, संसदीय कामकाज मंत्री