केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मानहानीचा दुसरा खटलाही दाखल केल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे.

जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात याआधी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे. सुनावणीदरम्यान, केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी जेटली यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दुसरा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांचे वकील जेठमलानी यांनी जेटलींबद्दल अपमानजनक टिप्पणी केली होती. त्याला न्यायालयानंही आक्षेप घेतला होता. केजरीवालांनीच अशी भाषा वापरण्यास सांगितली असेल तर यावर पुढील युक्तीवाद निरर्थक आहे, असा संताप न्यायालयानं व्यक्त केला होता. केजरीवाल यांनी जेटलींवर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यायला हवं, असं न्यायालयानं म्हटलं होतं. जेठमलानी यांनी वापरलेल्या भाषेला केजरीवाल यांची सहमती आहे का, असा प्रश्न जेटलींच्या वकिलांनी उपस्थित केला होता. त्यावर केजरीवाल यांच्या सहमतीनंच आपण अशी भाषा वापरली, असं जेठमलानी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर केजरीवालांविरोधात पुन्हा मानहानीचा खटला दाखल करावा लागेल, असा इशारा वकिलांनी दिला होता. त्यानुसार काल, सोमवारी जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा दुसरा खटलाही दाखल केला आहे. आता उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना बजावलेल्या नोटिशीला ते काय उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.